Ramkrishna Ghosh: देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा रामकृष्ण घोषने विजय हजारे ट्रॉफीत गोलंदाजी करताना दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत हिमाचल प्रदेश संघाविरूद्ध खेळताना पठ्ठ्याने ७ गडी बाद करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या दमदार गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्र संघाने हिमाचल प्रदेश संघाला पहिल्या डावात २७१ धावांवर रोखलं.
या सामन्यात महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. हिमाचल प्रदेश संघाकडून खेळताना पुखराज मनने १११ चेंडूंचा सामना करत ११० धावांची दमदार खेळी केली. पण त्याला इतर कुठल्याही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. महाराष्ट्राकडून गोलंदाजी करताना रामकृष्ण घोषने अंकित कलसी, एकांत सेन, इनेश महाजन, पुखराज मन, नितीन शर्मा, वैभव अरोरा आणि रोहित कुमार यांना बाद करत माघारी धाडलं. यादरम्यान त्याने ९.४ षटकात अवघ्या ३० धावा खर्च केल्या आणि ७ गडी बाद केले.
आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्जने केलं रिटेन
आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने रामकृष्ण घोषला ३० लाखांच्या मुळ किमतीत आपल्या संघात स्थान दिलं होतं. आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रामकृष्णा घोषला या स्पर्धेतील एकही सामना खेळण्याची संधी दिली गेली नव्हती. पण तरीदेखील त्याचं गोलंदाजीतील कौशल्य पाहता, चेन्नई सुपर किंग्जने त्याला ३० लाखात रिटेन केलं. दरम्यान आगामी हंगामात त्याला चेन्नई सुपर किंग्जकडून पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.
रामकृष्ण घोषची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
नाशिकमध्ये राहणारा रामकृष्णा घोष हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळतो. त्याला महाराष्ट्राकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने २१ गडी बाद केले आहेत. ७१ धावा खर्च करून ४ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. फलंदाजी करताना त्याने ४४३ धावा केल्या आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याला ६ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १० गडी बाद केले आहेत. तर ७ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. फलंदाजी करताना त्याने ११२ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्याने २ गडी बाद केले आहेत. यादरम्यान फलंदाजीत त्याने ४५ धावा केल्या आहेत.
