MS Dhoni IPL 2026 CSK Updates: चेन्नई सुपर किंग्स संघाने आगामी हंगामासाठी नव्या कोचची घोषणा केली आहे. सीएसकेने भारताचा माजी खेळाडू झहीर खानवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. यामुळे चेन्नई संघाच्या आगामी हंगामातील कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. यादरम्यान आता एम एस धोनी आता येत्या हंगामात आयपीएल खेळणार का, या प्रश्नाचं उत्तर सीएसकेच्या सीएईओ काशी विश्वनाथन यांनी दिलं आहे.
चेन्नई सुपर किंग्सने (CSK) एम.एस. धोनी खेळाडू म्हणूनच संघाचा भाग राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर धोनीच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू होती. स्टीफन फ्लेमिंगने परस्पर संमतीने पद सोडल्यानंतर धोनी त्याचा उत्तराधिकारी होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. अनेक वर्षे संघाच्या रणनीतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या धोनीने आता अधिकृतपणे मेंटॉरची भूमिका स्वीकारावी, अशी चर्चाही होती.
मात्र, CSKचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी सोमवारी या चर्चांना पूर्णविराम दिला. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ते म्हणाले, “तो खेळाडू म्हणून उपलब्ध आहे.” दरम्यान, दुखापतींच्या समस्येमुळे धोनीला IPL २०२६चा हंगाम खेळता आला नव्हता. युवा संघाचं लक्ष विचलित होऊ नये यासाठी त्याने चेन्नईतील प्रसिद्ध एम.ए. चिदंबरम स्टेडियमवरही जाणं टाळल्याचं वृत्त आहे.
काशी विश्वनाथन यांनी धोनी प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारणार नसल्याचे संकेत दिले असले, तरी याचा अर्थ धोनीचा संघातील निर्णयप्रक्रियेतील सहभाग पूर्णपणे संपेल, असं मानणं योग्य ठरणार नाही. तो CSKसाठी महत्त्वाचा आधार मानला जातो आणि झहीर खानच्या नियुक्तीमागेही धोनीची भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. धोनीला झहीरच्या क्षमतेवर विश्वास असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे दोघे मिळून CSKला पुन्हा यशाच्या मार्गावर आणण्यासाठी काम करू शकतात, अशी चर्चा आहे.
मात्र, अशा परिस्थितीत झहीरला धोनीची संघाच्या प्लेइंग-११मधील भूमिका नेमकी काय असावी, याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. वयाच्या ४५व्या वर्षी धोनीच्या फिटनेस, सातत्य आणि मैदानावरील कामगिरीबाबत प्रश्न उपस्थित केले जात असले, तरी इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे त्याच्या सामन्यात खेळण्याच्या शक्यता कायम आहेत.
त्यामुळे झहीरसमोरचं मोठं आव्हान असेल ते म्हणजे धोनीचा अनुभव आणि संघावरील त्याचा प्रभाव याचा योग्य उपयोग करताना भावनिक समीकरणांचा मैदानावरील निर्णयांवर परिणाम होऊ न देणं. नव्या प्रशिक्षकाला संघाची गरज, खेळाडूंची कामगिरी आणि धोनीचा अनुभव यांच्यात योग्य समतोल साधावा लागणार आहे.
