CSK vs LSG Turning Point: आयपीएल २०२६ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. रविवारी डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात लखनौने चेन्नईसमोर विजयासाठी २०४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला वेगवान सुरुवात मिळाली होती. त्यावरुन असं वाटलं होतं, की चेन्नईचा संघ हा एकतर्फी जिंकणार. पण शेवटी सामना फिरला होता. १९ व्या षटकात लखनौकडून चुका झाल्या नसत्या, तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता. नेमकं काय घडलं? जाणून घ्या या सामन्यातील टर्निंग पॉईंट.

चेन्नईला हा सामना जिंकण्यासाठी २०४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर संजू सॅमसन अवघ्या २८ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडवर मोठी जबाबदारी होती. त्याने उर्विल पटेलसोबत मिळून संघाचा डाव सांभाळला. उर्विलने अवघ्या १३ चेंडूंचा सामना करत या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं. त्याने २३ चेंडूत ६५ धावांचे योगदान दिले. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि ८ षटकार खेचले. तर ऋतुराज गायकवाडने २८ चेंडूंचा सामना करत ४२ धावांची खेळी केली. तर गेल्या सामन्यातील हिरो कार्तिक शर्मा अवघ्या २० धावा करून माघारी परतला.

या २ चुका लखनौला चांगल्याच महागात पडल्या

धावांचा पाठलाग करताना चेन्नईला चांगली सुरुवात मिळाली. पण लखनौच्या गोलंदाजांनीही चांगली सुरूवात करुन दिली होती. पण त्यांना क्षेत्ररक्षकांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. क्षेत्ररक्षकांनी सोपे झेल सोडले. पण १९ व्या षटकात सोडलेले ते २ झेल लखनौला चांगलेच महागात पडले. १२ चेंडूंमध्ये २१ धावांची गरज असताना १९ वे षटक टाकण्यासाठी आवेश खान गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर विकेटची संधी निर्माण झाली होती. पहिल्याच चेंडूवर प्रशांत वीरला झेलबाद करण्याची संधी निर्माण झाली होती. पण दिग्वेश राठीच्या हातून झेल सुटला. तो जर बाद झाला असता, तर या प्रेशरमध्ये नवा फलंदाज स्ट्राईकवर आला असता. पहिल्यांदा झेल सुटल्यानंतर पुढच्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवरही झेलबाद करण्याची संधी निर्माण झाली होती. पण यावेळी निकोलस पूरनने सोपा झेल सोडला. या २ पैकी एकही झेल पकडला गेला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.

लखनौ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

या पराभवासह लखनौचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. लखनौला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणं गरजेचं होतं. लखनौला आतापर्यंत ११ पैकी ८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. ६ गुणांसह लखनौचा संघ सर्वात शेवटी आहे. तर चेन्नई सुपर किंग्सने ११ पैकी ६ सामने जिंकले आहेत. १२ गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.