CSK vs RCB Song Controversy: आयपीएल २०२६ स्पर्धेत ५ एप्रिलला झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नईवर विजय मिळवला होता. या सामन्यादरम्यान एक गाणं वाजवल्यावरून आता चांगलाच वाद पेटला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा डाव सुरू होण्याआधी चिन्नास्वामी स्टेडियमवरील डीजेने ‘डोसा, इडली, सांबार, चटणी – चटणी हे गाणं वाजवलं होतं. आता यावर चेन्नई सुपर किंग्जने आक्षेप घेतला असून बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. हे गाणं दक्षिण भारतीय लोकांना ट्रोल करण्यासाठी जे मिम्स बनवले जातात, त्याच्या बॅकग्राउंडला वापरलं जातं.
हे प्रकरण आता थेट बीसीसीआयपर्यंत पोहोचलं आहे. आयपीएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल या प्रकरणाचा तपास करणार आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून तक्रार करण्यात आली असून तपास सुरू आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मॅनेजिंग डायरेक्टर काशी विश्वनाथन यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीत सांगितले की, “तुम्ही जर पाहिलं असेल, तर डीजे हा होम ग्राऊंडवर खेळत असलेल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी लावला जातो. पण चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रकरण जरा वेगळं होतं. आमच्या खेळाडूंवर टीका केली गेली. त्यामुळे आम्ही बीसीसीआयला पत्र लिहिलं असून चौकशी करायला सांगितलं आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “डीजे हा प्रतिस्पर्धी संघाची खिल्ली उडवण्यासाठी किंवा अपमान करण्यासाठी नसतो. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही दाक्षिणात्य भागातील संघ आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळते. या लढतीला ‘साऊदर्न डर्बी’ असं नाव देण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ आघाडीवर आहे. पण गेल्या काही सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या हंगामात झालेल्या सामन्यातही आपल्या होम ग्राऊंडवर खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्ज संघावर ४३ धावांनी विजय मिळवला होता.
