IPL 2026 CSK Jersey Promotion : इंडियन प्रिमीयर लीगचे नवा हंगाम सुरू होण्याच्या आधीच स्पर्धेतील दिग्गज संघ वादात सापडताना पाहायला मिळत आहेत. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडने चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध मद्रास उच्च न्यायालयात कॉपीराइट उल्लंघन केल्याप्रकरणी खटला दाखल केला आहे. चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या नवीन जर्सीच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियावर रजनीकांत यांच्या जेलर, जेलर २ आणि कुली या चित्रपटांमधील ऑडिओ ट्रॅक्स, बॅकग्राउंड म्युझिक आणि डायलॉग्जचा वापर केला होता. यानंतर सन टीव्हीने शुक्रवारी हे कायदेशीर पाऊल उचलले आहे.

सन टीव्ही नेटवर्कचे वकील जे. रविंद्रन यांनी न्यायमूर्ती सेंथिलकुमार राममूथी यांना सांगितले की सीएसकेने एक मार्च रोजी मेल मिळाल्याच्या नंतर कॉपीराइट मटेरियल वापरणे बंद केले. या मेलमध्ये परवानगीशिवाय मटेरियल वापरल्याचे नमूद करण्यात आले होते, तसेच सीएसकेने ते भविष्यातदेखील वापरू नये असेही बजावण्यात आले होते.

सीएसकेची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील पी. एस. रमन यांनी न्यायमूर्तींना सांगितले की, त्यांच्या अशिलाने संबंधित मटेरियल वापर बंद केला आहे आणि जर त्यांना भविष्यात ते वापरायचे असेल तर त्यापूर्वी आवश्यक ती रीतसर परवानगी घेतली जाईल.

रिपोर्टनुसार, वर उल्लेख केलेले चित्रपट सन टीव्ही नेटवर्कने निर्मिती केलेले आहेत आणि चित्रपटांचे संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी यापूर्वीच एका डॉक्युमेंटवर स्वाक्षरी केली होती, ज्यानुसार संगीताच्या व्यावसायिक वापराचे सर्व हक्क त्यांनी संबंधित प्रोडक्शन फर्मला दिले आहेत. हे कागदपत्र देखील न्यायालयातही सादर करण्यात आले.

सीएसके लीमिटेडने त्यांच्या नवीन जर्सीच्या प्रमोशनसाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चित्रपटातील साउंड ट्रॅक आणि डायलॉग्जचा वापर केल्याचे पाहून त्यांना धक्का बसला, असे फिर्यादी सन टीव्हीने म्हटले आहे. न्यायालयात माहिती देण्यात आली की, ही संघाची एक जर्सी २३९९ रुपयांना विकली जात असून चित्रपटातील साउंड ट्रॅक आणि डायलॉग्ज यांचा आर्थिक लाभासाठी अनधिकृतपणे वापर करण्यात आला.

फिर्यादीने न्यायालयाकडे सीएसके लिमीटेडला या अनधिकृत वारासाठी ताकीद देण्याची विनंती केली आणि या अनधिकृत वापरातून किती पैसा कमावण्यात आला याची सविस्तर हिशोब सादर करण्याचे आदेश द्यावेत मागणी केली. तसेच सीएसकेने मिळालेली रक्कम हा खटला निकाली निघत नाही तोपर्यंत न्यायालयात जमा करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. याबरोबरच सन टीव्ही नेटवर्कने या प्रकारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून १ कोटी रुपयांची मागणी केली आहे.