भारतीय टेनिसला नवा आयाम मिळवून देणाऱ्या चॅम्पियन्स टेनिस लीग स्पर्धेच्या संयोजकांना लीगचा पसारा वाढवण्याची इच्छा आहे. मात्र केवळ प्रसिद्धीसाठी रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या मोठय़ा खेळाडूंना लीगमध्ये सहभागी करुन घेण्यात काहीही अर्थ नसल्याचे सीटीएलचे संचालक आणि माजी खेळाडू विजय अमृतराज यांनी स्पष्ट केले.

‘सीटीएलमधील सर्व लढती गांभीर्याने खेळल्या जातात. हे प्रदर्शनीय सामने नाहीत. आम्हाला जत्रा भरवण्यात रस नाही. नोव्हाक जोकोव्हिच, रॉजर फेडरर तसेच राफेल नदाल यांच्यासारख्या मोठय़ा खेळाडूंना ताफ्यात सामील करणे आर्थिकदृष्टय़ाही परवडणारे नाही. सर्वच खेळांमध्ये लीगचे पेव फुटले आहे. मात्र आर्थिक ताकद लक्षात घेऊनच वाटचाल करणे आवश्यक आहे’, असे अमृतराज यांनी सांगितले.

पहिल्या हंगामापासून जागतिक क्रमवारीत अव्वल २५ मध्ये असणारे खेळाडू सीटीएलमध्ये खेळत आहेत. दुसऱ्या हंगामात लढती अधिक चुरशीच्या झाल्या. सानिया मिर्झाच्या साथाने जागतिक दुहेरी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतलेली मार्टिना हिंगिस सीटीएलच्या दुसऱ्या हंगामाचे आकर्षण होते. स्पर्धेतील संघ वाढवण्यासंदर्भात विचारले असता अमृतराज म्हणाले, ‘संघ वाढवण्याची आमची इच्छा आहे. आणखी काही शहरं संघ तयार करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र भरगच्च आंतरराष्ट्रीय वेळापत्रकातून लीगसाठी तारखा मिळवणे आव्हान आहे. लीगसाठी नोव्हेंबर महिन्यातील दोन आठवडेच उपलब्ध असतात. त्यातही विश्रांती घेण्याचा अनेकांचा कल असतो. त्यामुळे उपलब्ध खेळाडूंच्या संख्येवर परिणाम होतो.