बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे. स्पर्धेच्या दहाव्या दिवशी बॉक्सिंगमध्ये भारताला दोन सुवर्णपदकांची कमाई झाली. महिलांच्या ४८ किली वजनी गटात नितू घांगसने सुवर्णपदक पटकावले. तिच्या पाठोपाठ अमित पंघालनेही अंतिम सामन्यात विजय मिळवून सुवर्ण पदक मिळवले. त्यामुळे भारताच्या खात्यात आता १५ सुवर्णपदकं झाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या डेमी-जेडचा पराभव केला. २१ वर्षीय नितूच्या शानदार हल्ल्याला डेमी-जेडकडे कोणतेही उत्तर नसल्यामुळे तिला सहज विजय मिळाला. तिने यावर्षी भारताला बॉक्सिंगमध्ये पहिले पदक मिळवून दिले. नितूच्या विजयामुळे भारताला एकूण ४१वे पदक मिळाले.

नितूनंतर पुरुषांच्या बॉक्सिंगमध्ये अमित पंघालने सुवर्णपदक जिंकले. अमितने पुरुषांच्या फ्लायवेट गटातील अंतिम फेरीत इंग्लंडच्या कियारन मॅकडोनाल्डचा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील हे त्याचे पहिले-वहिले सुवर्णपदक ठरले. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

१६वर्षीय अमितला गेल्या वर्षी ऑलिंपिकमध्ये सुरुवातीच्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने कोणतीही चूक न करता अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. नितू आणि अमितच्या पदकांमुळे भारताची एकूण पदक संख्या ४३ झाली असून त्यात १५ सुवर्ण, ११ रौप्य आणि १७ कांस्य पदकांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cwg 2022 boxer amit panghal and nitu ghanghas won gold medals vkk
First published on: 07-08-2022 at 16:34 IST