Ind Vs Aus Gold Medal Match Result: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी (७ ऑगस्ट) महिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा ९ धावांनी पराभव झाला. परिणामी ऑस्ट्रेलियाचा संघ सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. तर, भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिलांच्या टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यात सुवर्णपदक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने ‘प्रथम विजेता’ होण्याचा मान मिळवला आहे. एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केलेल्या या सुवर्ण पदकाच्या लढतीत भारताला २० षटकांमध्ये १६२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, भारतीय संघ १९.३ षटकांमध्ये सर्वबाद १५२ धावा करू शकला.

सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर स्मृती मंधाना सहा तर शफाली वर्मा ११ धावा करून बाद झाल्या. त्यानंतर आलेल्या जेमिमाह रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने भारतीय डावाला आकार दिला. दोघींनी चौफेर फटकेबाजी करून भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. हरमनप्रीत कौरने ४३ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. तर जेमिमाहने ३३ चेंडूत ३३ धावा फटकावल्या. मात्र, त्या दोघी बाद झाल्यानंतर एकही भारतीय खेळाडू मैदानावर टीकू शकला नाही.

त्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. संघाची धावसंख्या नऊ असताना सलामीवीर अॅलिसा हेली बाद झाली. यानंतर बेथ मूनी आणि कर्णधार लॅनिंगने दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, ऑस्ट्रेलियन कर्णधार ३६ धावांवर धावबाद झाली.

हेही वाचा – CWG 2022 IND vs AUS W: धक्कादायक! अंतिम सामन्यात कोरोना बाधित खेळाडू उतरली मैदानात

ताहलिया मॅकग्राही पुढच्याच षटकात बाद झाली. भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियाला ठराविक अंतरानंतर आपले गडी गमवावे लागेल. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आठ गड्यांच्या मोबदल्यात १६१ धावा केल्या होत्या. सलामीवीर बेथ मुनीने सर्वाधिक ६१ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cwg 2022 ind w vs aus w gold medal match indian won silver medal as australia won by 9 runs vkk
First published on: 08-08-2022 at 01:13 IST