इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरातील अलेक्झांडर स्टेडियमवर खेळवल्या जात असलेल्या २२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सोमवारी (८ ऑगस्ट) सांगता झाली. यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६१ पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. यावेळी संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये पहिले पदक मिळवले होते. तर, मीराबाई चानूने पहिले सुवर्णपदक पटकावले होते. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर यावर्षी मुलींच्या तुलनेत मुलांनी जिंकलेल्या पदकांची संख्या जास्त आहे.

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकतालिकेमध्ये भारत चौथ्या स्थानावर राहिला. भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य अशी एकूण ६१ पदके जिंकली. चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. त्यावेळी भारताने, एकूण ६४ पदकांसह तिसरे स्थान पटकावले होते.

भारतीय पुरुष आणि महिला खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास, यावर्षी पुरुषांनी १३ सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्यपदकांसह एकूण ३५ पदके जिंकली आहेत. भारतीय महिला खेळाडूंनी आठ सुवर्ण, सहा रौप्य आणि नऊ कांस्य पदकांसह एकूण २३ पदके जिंकली आहेत. त्यामुळे पुरुष खेळाडूंनी महिलांच्या तुलनेत सरस कामगिरी केल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – नीरज चोप्राने केले पाकिस्तानच्या खेळाडूचे अभिनंदन! आनंद महिंद्रा म्हणाले,”दोघांनाही…”

गुणतालिकेत भारताची कामगिरी यावेळी काहीशी खालावली आहे. २०१८ गोल्डकोस्ट स्पर्धेत भारत तिसऱ्या स्थानी होता. यावर्षी भारत चौथ्या स्थानी आला आहे. पण, उल्लेखनीय म्हणजे नेमबाजांच्या मदतीशिवाय भारताने यावेळी ६१ पदके जिंकली आहेत. गोल्ड कोस्टमध्ये भारताने नेमबाजीत सर्वाधिक १६ पदके जिंकली होती. यामध्ये सात सुवर्ण, पाच रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश होता.

राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी हा एक पर्यायी खेळ आहे. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजन समितीने काही कारणास्तव नेमबाजीला स्थान दिले नाही. नाहीतर भारतीय नेमबाजांनी नक्कीच पदकांची कमाई केली असती.