scorecardresearch

Commonwealth Games 2022: बॅडमिंटनमध्ये पदकांची हॅट्ट्रिक! सात्विकसाईराज अन् चिरागने पटकावले सुवर्ण पदक

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty Gold Medal: हे भारताचे बॅडमिंटनमधील तिसरे आणि बर्मिंगहॅममधील एकूण २१वे सुवर्णपदक ठरले.

Commonwealth Games 2022: बॅडमिंटनमध्ये पदकांची हॅट्ट्रिक! सात्विकसाईराज अन् चिरागने पटकावले सुवर्ण पदक
फोटो सौजन्य – ट्विटर

बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे. आज (८ ऑगस्ट) स्पर्धेच्या शेवटच्या भारतीय बॅडमिंटनपटूंनी जबरदस्त खेळ दाखवला आहे. सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. हे भारताचे बॅडमिंटनमधील आजच्या दिवसातील तिसरे सुवर्ण पदक ठरले आहे.

बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा सामना इंग्लंडच्या बेन लेन आणि सीन वेंडी यांच्याशी झाला. भारतीय जोडीने इंग्लंडच्या जोडीचा २१-१५, २१-१३ अशा फरकाने पराभव केला. हे भारताचे बॅडमिंटनमधील तिसरे आणि बर्मिंगहॅममधील एकूण २१वे सुवर्णपदक ठरले.

महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात भारताची तारांकित खेळाडू पीव्ही सिंधूने सुवर्णपदकाची कमाई केली. तिच्या पाठोपाठ लक्ष्य सेननेदेखील पुरुष एकेरीचा अंतिम सामना जिंकला. सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी कामगिरीमध्ये सातत्य ठेवून सिंधू आणि लक्ष्यच्या पावलावर पाऊल ठेवले. सात्विक आणि चिरागचे हे पहिले सुवर्ण आणि एकूण दुसरे राष्ट्रकुल पदक ठरले आहे. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोघांनी रौप्य पदकाची कमाई केली होती.

हेही वाचा – CWG 2022: लक्ष्य सेन चमकला; बॅडमिंटनमध्ये भारताला आणखी एक सुवर्ण

त्यापूर्वी, पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत रविवारी सात्विकसाईराज आणि चिरागने मलेशियाच्या चॅन पांग सून आणि टॅन कियान मेंग से यांचा पराभव केला होता. या सामन्याच्या पहिल्या सेटपासूनच भारतीय संघाचा वरचष्मा होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.