बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या २२व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार कामगिरी सुरू आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांच्या कमाईचा धडाका सुरू केला आहे. या मोहिमेची सुरुवात मराठमोळ्या संकेत सरगरने केली होती. राष्ट्रकुल स्पर्धेत संकेतने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावत भारताचे पदकांचे खाते उघडले होते. मात्र, असे करताना त्याच्या हाताला दुखापत झाली होती. या गोष्टीची दखल घेऊन केंद्र शासनाने संकेतच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केली आहे. भारताच्या सुवर्ण पदक विजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने ट्वीट करून याबाबत माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेटलिफ्टींगमध्ये ५५ किलोग्रॅम वजनी प्रकारात संकेत सरगरने रौप्य पदक मिळवले. संकेतने पहिल्या फेरीत स्नॅच या प्रकारात ११३ किलोग्राम वजन उचलले. तर, दुसऱ्या फेरीत क्लीन एंड जर्कमध्ये १३५ किलोग्राम वजन उचलले होते. दुसऱ्या फेरीदरम्यान संकेत जखमी झाला होता. बक्षिस वितरण समारंभातदेखील तो आपला हात गळ्यामध्ये बांधूनच आला होता.

संकेतची दुखापत गंभीर स्वरूपाची होती. त्याच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते. मात्र, सांगलीतील अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या संकेतला शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नव्हता. म्हणून, वेटलिफ्टिंग फेडरेशनने भारतीय क्रीडा प्राधिकरणाला त्याचा खर्च करण्याचा विनंती केली होती. ही विनंती तत्काळ मान्य झाली आणि लंडनमधील रुग्णालयात संकेतवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. संकेतच्या शस्त्रक्रियेसाठी तत्काळ मदत केल्यामुळे मीराबाई चानूने भारत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

हेही वाचा – VIDEO: ‘०.५ सेकंद की किमत तुम क्या जानो…’, अवघ्या काही क्षणांच्या फरकामुळे हुकले अविनाशचे सुवर्ण पदक

संकेतने देशासाठी पहिले पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याचे अभिनंदन केले होते. २१ वर्षीय संकेतच्या नावावर सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये स्पर्धेत २५६ किलोग्रॅम वजन उचलण्याचा विक्रम आहे. तसेच राष्ट्रीय स्थरावरही त्यांने अनेकदा पदकं मिळवली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cwg 2022 silver medal winner sanket sargar underwent surgery in london sai helped vkk
First published on: 07-08-2022 at 19:48 IST