Asmita Dey wins historic first Judo gold medal in CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताने चौथ्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ज्युडो भारताची लेक अस्मिता डे हिने देशाला सुवर्णपदक पटकावून दिलं आहे. भारताच्या अस्मिता डे हिने ४८ किलो वजनी गटात अंतिम फेरीत कॅनेडियन खेळाडूचा पराभव केला आणि ‘सडन डेथ’ फेरीत विजय मिळवला. हा विजय विशेष महत्त्वाचा आहे कारण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ज्युडो या खेळामध्ये भारताचं हे पहिलंच सुवर्णपदक ठरलं आहे. अस्मिता डे नंतर पुरूषांच्या 60 किलो वजनी गटात हर्ष सिंगने देखील सुवर्णपदकाची कमाई केली आहे. यासह ज्युडोमध्ये भारताने दुसरं सुवर्णपदक पटकावलं.
अस्मिता डे हिने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG) सुवर्णपदक कसं जिंकलं?
ग्लासगो येथे झालेल्या महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिने कॅनडाच्या हायडी क्वाच हिचा पराभव करत कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय ज्युडोपटू होण्याचा मान पटकावला. तिच्या या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय ज्युडोचा राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकाचा दुष्काळ संपुष्टात आला आणि ग्लासगोमधील भारताच्या मोहिमेत आणखी एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली.
२२ वर्षीय अस्मिताने अत्यंत चुरशीच्या लढतीत युकोच्या आधारे २-१ अशा फरकाने विजय मिळवला. संपूर्ण सामन्यात तिने संयम आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचं प्रदर्शन करत भारतीय ज्युडोसाठी ऐतिहासिक क्षण घडवला. तिच्या या यशामुळे भारताला कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील ज्युडोमधील पहिले सुवर्णपदक मिळालं.
Who is Asmita Dey: कोण आहे अस्मिता डे?
कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय ज्युडोपटू ठरलेल्या अस्मिता डे हिचा जन्म २२ मार्च २००३ रोजी त्रिपुरातील दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनिया येथे झाला. सायकल दुरुस्तीचं छोटंसं दुकान चालवणाऱ्या वडिलांची मुलगी ते भारताची पहिली राष्ट्रकुल ज्युडो सुवर्णपदक विजेती असा तिचा प्रवास संघर्ष, जिद्द आणि अथक मेहनतीने घडलेला आहे.
सामान्य कुटुंबातून आलेल्या अस्मिताला बालपणी स्पर्धात्मक क्रीडा क्षेत्राची फारशी ओळख नव्हती. सुरुवातीला तिने ८०० मीटर धावण्यामध्ये सहभाग घेतला. मात्र, एका प्रशिक्षकाने तिच्यातील क्षमता ओळखून तिला ज्युडो या खेळाकडे वळवलं. २०१५ मध्ये तिने त्रिपुरा स्पोर्ट्स स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तिथे बीना देबनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतल्यानंतर पुढे माणिक लाल देब यांच्याकडे तिने ज्युडो खेळाचे धडे गिरवले. शालेय क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया स्पर्धांमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर अस्मिताची भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) भोपाळ प्रादेशिक केंद्रात निवड झाली. राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत तिने आपल्या खेळात आणखी सुधारणा करत आंतरराष्ट्रीय स्तरासाठी स्वतःला तयार केलं. जुलै २०२२ मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई कॅडेट आणि ज्युनिअर ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेत अस्मिताने कांस्यपदक जिंकत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली. या स्पर्धेत तिने चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पदक जिंकलं आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवणारी त्रिपुराची पहिली ज्युडोपटू ठरली.
