CWG 2026 Boxing Medals India Results: भारताच्या महिला व पुरूष बॉक्सर गटाने कॉमनवेल्थ २०२६ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली आहे. भारताच्या लेकींनी तर सुवर्णपदकांची चळत लावली आणि सलग ५ सुवर्णपदक जिंकली. तर ऑलिम्पिक पदक विजेती लव्हलिना बोर्गाेहेनला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर बहिणी-बहिणी साक्षी चौधरी व प्रिया घंघास यांनी सुवर्णपदकं जिंकली. बॉक्सिंगच्या कोणत्या खेळाडूंनी पदकांवर आपलं नाव कोरलं आहे, पाहूया यादी.

कॉमनवेल्थमध्ये पदकं पटकावलेल्या भारताच्या बॉक्सरची यादी

प्रीती पवार – सुवर्णपदक – ५४ किलो वजनी गट (महिला)
जास्मीन लम्बोरिया – सुवर्णपदक – ५७ किलो वजनी गट (महिला)
जादूमणी सिंग मांडेंगबाम – रौप्यपदक – ५५ किलो वजनी गट (पुरूष)
साक्षी चौधरी – सुवर्णपदक – ५१ किलो वजनी गट (महिला)
प्रिया घंघास – सुवर्णपदक – ६० किलो वजनी गट (महिला)
लव्हलिना बोर्गाेहेन – रौप्यपदक – ७५ किलो वजनी गट (महिला)
सचिन सिवाच – रौप्यपदक – ६० किलो वजनी गट (पुरूष)
अंकुश पंघाल – सुवर्णपदक ८० किलो वजनी गट (पुरूष)
नरेंद्र बेरवाल – रौप्यपदक ९० किलो वजनी गट (पुरूष)

भारताच्या खेळाडूंची अंतिम फेरीतील कामगिरी

प्रीती पवार – सुवर्णपदक

हरियाणातील भिवानीची प्रीती पवार हिने बॉक्सिंगमध्ये भारताचं सुवर्णपदक जिंकत पदकांचं खातं उघडलं. आशियाई विजेती असलेल्या प्रीतीने कॉमनवेल्थ विजेतेपदाचाही मान पटकावला आहे. अंतिम सामन्यात तिने स्कार्लेट सवाना डेलगाडो हिचा ५-० अशा एकमताच्या निर्णयाने पराभव करत दमदार शैलीत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

जास्मिन लम्बोरिया – सुवर्णपदक

भारतीय बॉक्सरांची विजयी घोडदौड कायम राहिली असून, भारतासाठी हा दिवस आणखी संस्मरणीय ठरला. जास्मिनने उत्तर आयर्लंडच्या गतविजेत्या आणि तीन वेळा कॉमनवेल्थ पदक विजेत्या मायकेला वॉल्श हिचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं.

जादूमणि सिंग – रौप्य पदक

प्रथमच कॉमनवेल्थ स्पर्धा खेळण्यासाठी उतरलेल्या जादूमणि सिंगने रौप्य पदकाची कमाई केली. जादूमणी सिंगचं सुवर्णपदक मात्र हुकलं. पुरुषांच्या ५५ किलो गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या जादूमणी सिंगला ऑस्ट्रेलियाच्या जाय डिक्सनकडून पराभव स्वीकारावा लागला आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. बॉक्सिंगमधील अंतिम फेरीत भारताचा हा दिवसातील पहिलाच पराभव ठरला होता.

साक्षी चौधरी – सुवर्णपदक

साक्षी चौधरी हिने महिला ५१ किलो गटाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या रुबी व्हाइट हिचा ५-० अशा एकमताच्या निर्णयाने पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. सामन्याच्या सुरुवातीला साक्षी चौधरीने संयम राखत खेळ केला. त्यानंतर दोन्ही बॉक्सर आक्रमक झाल्या आणि एकमेकींवर जोरदार हल्ले चढवू लागल्या. मात्र, साक्षीचे पंच अधिक अचूक आणि प्रभावी ठरत असल्याचं स्पष्ट दिसून आलं. परिणामी, पंचांनी एकमताने सामन्याचा निकाल साक्षीच्या बाजूने दिला.

प्रिया घंघास – सुवर्णपदक

महिला ६० किलो गटाच्या अंतिम सामन्यात प्रिया घंघासने कॅनडाच्या मारी-बथूल अल-अहमदियेहविरुद्ध दुसऱ्या फेरीत शानदार पुनरागमन केलं. अंतिम फेरीत प्रिया अधिक मजबूत शरीरयष्टीची आणि उंचीनेही प्रतिस्पर्धीपेक्षा सरस असल्याचं दिसून आलं. तिने कॅनडाच्या बॉक्सरपासून योग्य अंतर राखत गरज पडेल तेव्हाच अचूक पंच मारण्याची रणनीती अवलंबली. वेळही तिच्या बाजूने जावा, यासाठी ती अत्यंत संयमाने खेळताना दिसली. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या प्रियाला आता कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावलं.

अरूंधती चौधरी – सुवर्णपदक

अरुंधती चौधरीने आपल्या चपळ पायांच्या हालचालींचा उत्कृष्ट वापर करत इंग्लंडच्या शँटेल रीडला सतत रिंगभर फिरवत ठेवलं. रीडला वारंवार मागे वळून आपली भूमिका बदलावी लागत होती. सामना सावध रणनीतीनेच सुरू होता, मात्र संधी मिळताच दोन्ही बॉक्सर एकमेकींवर जोरदार पंचांचा वर्षाव करत होत्या. विशेष म्हणजे, चेहऱ्यावर पंचांचा मारा होत नसताना अरुंधतीच्या चेहऱ्यावर कायम हसू दिसत होतं. तिने संपूर्ण सामन्याचा वेग आणि लय आपल्या नियंत्रणात ठेवली होती. त्यामुळे रीडला अरुंधतीच्या अटींवरच लढावं लागत असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. अखेरीस एकतर्फी विजय मिळवत अरूंधतीने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

लव्हलिना बोर्गाेहन – रौप्य पदक

भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लव्हलिना बोर्गोहेनला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. महिला अंतिम सामन्यात केवळ एका पंचाने लव्हलिनाच्या बाजूने निकाल दिला, तर उर्वरित चार पंचांनी ऑस्ट्रेलियाच्या ग्रीनट्री हिलाच त्या फेरीची स्पष्ट विजेती ठरवलं. विशेष म्हणजे, डोळ्याच्या वर झालेल्या जखमेतून रक्तस्राव होत असतानाही ग्रीनट्रीने सामना जिंकला, तर लव्हलिनाचं सुवर्णपदकाचं स्वप्न अपूर्ण राहिलं आणि रौप्यपदक आपल्या नावे केलं.

सचिन सिवाच – सुवर्णपदक

पुरुषांच्या ६० किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात सचिन सिवाच नामिबियाच्या ट्रायअगेन मॉर्निंग न्देवेलोला याच्याविरूद्ध पहिल्या आणि दुसऱ्या फेरीनंतर गुणांमध्ये पिछाडीवर होता. मात्र, त्याने तिसऱ्या आणि अखेरच्या फेरीत जबरदस्त पुनरागमन केलं. सचिनच्या दमदार पंचामुळे नामिबियाच्या ट्रायअगेन मॉर्निंग न्देवेलोला रिंगवर कोसळावं लागलं. त्यानंतर पंचांनी त्याला स्टँडिंग एट काउंट दिला आणि सामन्याच्या अखेरच्या क्षणी घडलेली ही घटना निर्णायक ठरली. अखेरीस ३-२ अशा विभाजित निर्णयाने सचिनला विजेता घोषित करण्यात आलं. पाचपैकी चार पंचांनी तिसरी फेरी सचिनच्या बाजूने दिली, तर केवळ एका पंचाने ट्रायअगेन मॉर्निंग न्देवेलोला पसंती दिली. सचिनने दमदार पुनरागमन करत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

अंकुश पंघाल – सुवर्णपदक

भारताची आणखी एका सुवर्णपदकाच्या आशा असलेल्या अंकुश पंघालने पुरुषांच्या ८० किलो गटाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डिमेजी शिट्टूविरुद्ध पहिल्या दोन फेऱ्यांनंतर आघाडी मिळवली होती. पहिल्या फेरीत अंकुशला स्टँडिंग काउंट मिळाला आणि पाचही पंचांच्या गुणपत्रिकेत तो ९-१० असा पिछाडीवर होता. मात्र, दुसऱ्या फेरीत त्याने शानदार पुनरागमन केलं. याच फेरीत शिट्टूचा एक गुण वजा करण्यात आला, तर तीन पंचांनी दुसरी फेरी अंकुशच्या बाजूने दिली. त्यामुळे अखेरच्या फेरीपूर्वी तीन पंचांच्या गुणपत्रिकेत अंकुश आघाडीवर होता. अंतिम फेरीतही शिट्टूचा आणखी एक गुण वजा करण्यात आला. त्यामुळे त्याच्यासाठी सामना जिंकण्याची शक्यता संपुष्टात आली आणि अंकुश पंघालने दमदार विजय मिळवत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली.