Praveen Chithravel Silver Selva Prabhu Bronze CWG Triple Jump: भारतीय अॅथलीट प्रवीण चित्रावेल आणि सेल्वा प्रभू थिरुमारन यांनी कॉमनवेल्थ गेम्स २०२६मधील पुरुषांच्या तिहेरी उडी (ट्रिपल जंप) स्पर्धेत अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावत भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. भारताच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा अजून एका क्रीडा प्रकारात दोन खेळाडूंनी पदकांची कमाई केली.

प्रवीणने आपल्या चौथ्या प्रयत्नात १६.५८ मीटर अशी सर्वोत्तम उडी मारत रौप्यपदकावर नाव कोरलं, तर सेल्वा प्रभूने १६.५२ मीटरची सर्वोत्तम उडी घेत कांस्यपदकाची कमाई केली. स्पर्धेच्या पहिल्या तीन फेऱ्यांनंतर प्रवीण १६.०५ मीटरच्या पहिल्या प्रयत्नासह पाचव्या स्थानावर होता. त्यानंतर तिसऱ्या फेरीत त्याने १६.३१ मीटरची उडी घेत आपली कामगिरी उंचावली आणि चौथ्या प्रयत्नात १६.५८ मीटरची दमदार उडी मारत काही काळासाठी आघाडीही घेतली.

दुसरीकडे, सेल्वा प्रभू थिरुमारन याने दुसऱ्या प्रयत्नात १६.१७ मीटरची उडी मारत कांस्यपदकाच्या शर्यतीत स्थान मिळवलं. त्यानंतर तिसऱ्या फेरीत त्याने १६.४३ मीटरची उडी घेतली आणि अखेरीस १६.५२ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह कांस्यपदक पटकावलं. या दुहेरी पदकांमुळे ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६मधील अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी आणखी अधोरेखित झाली.

दरम्यान, यापूर्वी भारतीय बॉक्सर जास्मिन लम्बोरिया हिने महिला ५७ किलो गटाच्या अंतिम सामन्यात विद्यमान विजेती मायकेला वॉल्श हिचा ५-० अशा एकमताच्या निर्णयाने पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. जयस्मिनच्या या विजयामुळे भारताला त्या दिवशी बॉक्सिंगमधील दुसरं सुवर्णपदक मिळालं. याआधी प्रीती पवार हिने महिला ५४ किलो गटात सुवर्णपदक जिंकत भारताचं खातं उघडलं होतं. जयस्मिनच्या विजयासह ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने बॉक्सिंगमध्ये सलग दुसरं सुवर्णपदकही आपल्या नावावर केलं.