वृत्तसंस्था, ग्लासगो
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भालाफेक प्रकारात भारताने दुहेरी पदककमाई केली. वलयांकित भालाफेकपटू नीरज चोप्राने समाधानकारक कामगिरी करताना रौप्यपदक मिळवले, तर त्याचा सहकारी यशवीर सिंहने पदार्पणातच मात्र सर्वांना चकित करताना कांस्यपदकावर नाव कोरले.
थंड हवा आणि सोसाट्याचा वारा अशा प्रतिकूल परिस्थितीने भालाफेकपटूंसमोर आव्हान उपस्थित केले. टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक आणि पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या २८ वर्षीय नीरजने दुसर्या प्रयत्नात ८५.८३ मीटरची फेक करत हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. हा प्रयत्न त्याला दुसरे स्थान मिळवून देण्यासाठी पुरेसा ठरला. दोन महिन्यांपूर्वी दोहा डायमंड लीगमध्ये चौथ्या क्रमांकावर राहताना त्याने ८५.६९ मीटर अंतर गाठले होते. त्यापेक्षा ही कामगिरी किंचित सरस ठरली. नीरजला पुढील प्रयत्नांत कामगिरी उंचावता आली नाही.
भारताच्याच २४ वर्षीय यशवीरने पहिल्याच राष्ट्रकुल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने सहाव्या आणि अंतिम प्रयत्नात ८५.४१ मीटर भाला फेकत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आणि कांस्यपदक पटकावले. यापूर्वी त्याची सर्वोत्तम कामगिरी ८३.७२ मीटर होती. पाचव्या फेरीनंतर तो ८१.३३ मीटरसह सातव्या स्थानावर होता. मात्र, अखेरच्या प्रयत्नात अविस्मरणीय कामगिरी करत त्याने थेट तिसरे स्थान मिळवले. राष्ट्रकुलमध्ये एकाच वेळी दोन भालाफेकपटूंनी विजयमंच गाठण्याची ही पहिली वेळ ठरली. स्पर्धेतील तिसरा भारतीय खेळाडू रोहित यादव ८१.५६ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह सातव्या स्थानावर राहिला.
श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने अपेक्षेप्रमाणे ८९.७५ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह सुवर्णपदक जिंकले. त्याने दुसर्याच प्रयत्नात ही कामगिरी नोंदवली. प्रतिकूल परिस्थितीत खेळाडूंना स्पर्धा करावी लागत असल्याने ९० मीटरच्या उंबरठ्याजवळची ही फेक विशेष कौतुकास्पद ठरली. चालू हंगामात ९० मीटरचा टप्पा ओलांडणारा तो एकमेव भालाफेकपटू आहे. जूनमध्ये रोम डायमंड लीग जिंकताना त्याने ९२.६२ मीटरचे अंतर नोंदवले होते.
दुखापतीतून सावरत पुनरागमन
’ नीरज चोप्रा गेल्या वर्षी सप्टेंबरपासून पाठीच्या खालच्या भागाच्या दुखापतीने त्रस्त होता. त्यामुळे त्याचे पुनरागमन उशिरा झाले आणि त्याने थेट दोहा डायमंड लीगमधून स्पर्धात्मक पुनरागमन केले.
’ ही त्याची दुसरी राष्ट्रकुल स्पर्धा होती. यापूर्वी त्याने २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. सध्या तो पूर्णपणे तंदुरुस्त नसला, तरी हळूहळू लय पकडत असल्याचे त्याने सांगितले.
’ दुखापतीतून सावरल्यानंतरचे पुनरागमन समाधानकारक असल्याचे नीरजने सांगितले. ‘‘माझी तंदुरुस्ती पूर्वीसारखीच आहे, असे मी म्हणणार नाही. मात्र, मी हळूहळू त्या पातळीपर्यंत पोहोचत आहे. आशियाई खेळांसाठी
अजून वेळ आहे. त्यापूर्वी मी डायमंड लीगमध्ये भाग घेईन. तिथे अधिक सुधारणा होईल. पुढे आणखी स्पर्धा आहेत. त्यामुळे मी समाधानी आहे,’’ असे नीरज म्हणाला.
तिहेरी उडीतही रौप्य, कांस्य
तिहेरी उडीत भारताच्या प्रवीण चित्रवेलने रौप्य, तर सेल्व्हा प्रभू तिरुमारनने कांस्यपदक पटकावले. आशियाई खेळांतील कांस्यपदक विजेत्या चित्रवेलने ग्लासगोमध्ये १६.५८ मीटरची उडी मारत रौप्यपदक जिंकले. सेल्व्हा प्रभू १६.५२ मीटर उडीसह त्याच्या पाठोपाठ तिसर्या स्थानावर राहिला. जमैकाच्या जॉर्डन स्कॉटने १६.७२ मीटरची उडी मारत सुवर्णपदक पटकावले. दरम्यान, महिलांच्या १०,००० मीटर चालण्याच्या शर्यतीत भारताच्या पदरी निराशा पडली. प्रियांका गोस्वामीला ४५:५३.९३ अशी हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवूनही सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
ऑलिम्पिक विजेत्या नदीमचे अपयश
भालाफेकीत श्रीलंका आणि भारताच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. यावेळी दोन माजी जागतिक विजेत्यांना मात्र पदकापासून वंचित राहावे लागले. ग्रेनेडाचा अँडर्सन पीटर्स ८३.८८ मीटरच्या कामगिरीसह चौथ्या, तर विद्यमान जागतिक विजेता त्रिनिदादचा केशरॉन वॉलकॉट ८२.५५ मीटरच्या कामगिरीसह सहाव्या स्थानावर राहिला. पॅरिस ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता पाकिस्तानचा अर्शद नदीम ७७.४१ मीटरच्या कामगिरीसह नवव्या स्थानावर राहिला. नदीम हा या स्पर्धेचा गतविजेताही होता.
