ओस्लो : बुद्धिबळ जगज्जेतेपद मिळवल्यापासून गेल्या दीड वर्षात मला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे दिग्गजांकडून होणारी टीका रास्तच आहे. मात्र, मी याचे दडपण घेत नाही किंवा त्याने विचलितही होत नाही, असे वक्तव्य भारताचा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेशने केले. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
गुकेशने २०२४ मध्ये चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करत बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता ठरण्याचा मान मिळवला होता. मात्र, त्यानंतर त्याला जगज्जेत्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या वर्षी तो टाटा स्टील स्पर्धेत दहाव्या, प्राग आंतरराष्ट्रीय चेस फेस्टिव्हलमध्ये नवव्या, तर सुपरबेट स्पर्धेत सहाव्या स्थानी राहिला. त्याला मॅग्नस कार्लसन, गॅरी कास्पारोव आणि ॲनातोली कार्पोव्ह यांसारख्या माजी जगज्जेत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, त्यांनी आपल्यावर केलेली टीका योग्य असल्याचे १९ वर्षीय गुकेश म्हणतो.
‘‘माझ्यावर कोण काय टीका करत आहे, हे सर्व मी पाहत नाही. मात्र, काही जणांनी केलेल्या टीका मी ऐकल्या आहेत आणि त्या योग्यच आहेत. गेल्या दीड वर्षात माझी कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच खालावलेली आहे. त्यामुळे लोकांनी मत व्यक्त करणे स्वाभाविक आहे. परंतु त्याकडे मी फार लक्ष देत नाही. सर्वोत्तम खेळ करणे हे माझे काम आहे,’’ असे गुकेश म्हणाला.
गुकेश आता नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग नोंदवत असून या वेळी त्याच्यासमोर कार्लसनचेही आव्हान असेल. कार्लसन मायदेशात विक्रमी आठव्या जेतेपदाच्या शोधात आहे. गेल्या नॉर्वे स्पर्धेत गुकेशने कार्लसनवर मात केली होती. यंदाही दर्जेदार कामगिरीचे त्याचे लक्ष्य आहे.
भारतात खेळण्याचा आनंद वेगळाच…
जगज्जेतेपदाची लढत यंदा भारतात झाली तर त्याचा आनंदच वेगळा असेल, असे गुकेशने नमूद केले. या लढतीत गुकेशसमोर जावोखिर सिंदारोवचे आव्हान असेल. ‘‘लढत कुठेही झाली तरी मी सज्ज असेन. पण लढत भारतात झाली, तर माझ्यासाठी ते अधिक खास असेल. मात्र, त्याच वेळी मायदेशात खेळताना मला दडपणाचाही सामना करावा लागेल. किताब जिंकण्यापेक्षा तो टिकवणे अधिक अवघड असते,’’ असे गुकेश म्हणाला.
