|| अन्वय सावंत,

मुंबई : वडिलांकडून प्रेरणा घेत फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मुंबईकर भूमिका मानेची पुढील वर्षी होणाऱ्या १७ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या शिबिरात निवड झाली आहे. जमशेदपूर येथे सुरु असलेल्या ३५ सदस्यीय राष्ट्रीय शिबिरात सहभागी झालेली आघाडीपटू भूमिका ही महाराष्ट्राची एकमेव खेळाडू आहे.

१६व्या वाढदिवसाच्या तीन दिवसांनंतर कनिष्ठ संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड होणे तिच्यासाठी अनपेक्षित होते. मात्र, या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यास ती सज्ज आहे. ‘‘आम्ही आता सरावाला सुरुवात केली असून सगळ्याच खेळाडू खूप प्रतिभावान आहेत. सर्व प्रशिक्षकांचे आम्हाला चांगले मार्गदर्शन लाभत आहे. आता मला कनिष्ठ विश्वचषकात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल अशी आशा आहे,’’ असे दिएगो मॅराडोना यांना आदर्श मानणाऱ्या भूमिकाने सांगितले.

भूमिकाच्या फुटबॉल प्रवासाची सुरुवात वयाच्या ११व्या वर्षीच झाली. तिचे वकिली क्षेत्रात कार्यरत असलेले वडील भरत माने स्थानिक पातळीवर फुटबॉल खेळायचे. ‘‘वडिलांना फुटबॉल खेळताना पाहून माझ्यातही या खेळाची गोडी निर्माण झाली. आई-वडिलांना मला फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. वडिलांनी माझा वैयक्तिक सराव घेतला. त्यामुळे माझ्या खेळात दिवसागणिक सुधारणा होत गेली,’’ असे भूमिका म्हणाली.

शिवाजी पार्कात सुरुवातीला फुटबॉलचे धडे गिरवल्यावर भूमिकाला वांद्रे येथील कॉम्पेनेरोज एससी संघाचे संस्थापक आणि प्रशिक्षक सिडनी अलेक्झांडर यांचे मार्गदर्शन लाभले. तिने माहीमच्या कनोसा शाळेचे प्रतिनिधित्व करताना विविध वयोगटांत ४० हून अधिक गोल झळकावले. तसेच तिने काही स्थानिक स्पर्धांत मुंबईचे नेतृत्वही केले आहे. आता तिने देशाकडून खेळण्याचे लक्ष्य ठेवले असून त्या दिशेने तिने वेगाने वाटचाल सुरु केली आहे.

स्पर्धापरीक्षेच्या तयारीची योजना

खालसा महाविद्यालयाची विद्यार्थिनी भूमिकाचे फुटबॉल खेळत असतानाच अभ्यासाकडेही दुर्लक्ष झालेले नाही. ‘‘फुटबॉलपटू म्हणून प्रगती करत असतानाच भविष्यात स्पर्धापरीक्षांची तयारी करण्याचीही अकरावीत शिकणाऱ्या भूमिकाची योजना आहे,’’ असे तिचे वडील भरत माने यांनी सांगितले.