Danish Kaneria Statement on Gautam Gambhir about Pakistan Cricket : बांगलादेशविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला लाजिरवाणा पत्करावा लागला. यानंतर क्रिकेट विश्वात पाकिस्तानची चांगलीच फजिती झाली आहे. यावर आता माजी खेळाडू दानिश कनेरियाने पाकिस्ता क्रिकेट बोर्डाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला, मैदानावरील आणि मैदानाबाहेरचे प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानला गौतम गंभीरसारख्या कणखर प्रशिक्षकाची गरज आहे. कारण मागील काही काळापासून पाकिस्तान संघाची कामगिरी चांगली झालेली नाही. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानने प्रशिक्षक बदलले.

पाकिस्तानने गॅरी कर्स्टन यांची मर्यादित षटकांच्या फॉर्मेटसाठी प्रशिक्षक आणि जेसन गिलेस्पी यांची कसोटी फॉरमॅटचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. यानंतरही पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीत कोणताही बदल झालेला नाही. टी-२० विश्वचषकातही पाकिस्तानला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आणि गट स्टेजमधूनच बाहेर पडावे लागले.पाकिस्तानचा पराभवाची मालिका इथेच थांबली नाही, तर अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला घरच्या मैदानावर ०-२ ने पराभवाचा सामना करावा लागला.

दानिश कनेरिया काय म्हणाला?

एका वाहिनीशी बोलताना कनेरिया म्हणाला की, पाकिस्तानमध्ये सर्व काही हलक्यात घेतले जात आहे आणि ते सतत कर्णधार बदलत असतात. कनेरिया म्हणाला की, जर ते एखाद्याला खेळाडूला कर्णधार करत असतील, तर त्याला किमान एक वर्ष संघाचे नेतृत्व करण्याची परवानगी दिली पाहिजे. त्याचबरोबर प्रशिक्षकाने काही कठोर निर्णय घ्यावेत.

हेही वाचा – Moeen Ali Retirement : इंग्लंडला दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या स्टार अष्टपैलू खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

कर्णधाराला साथ द्यायला हवी –

दानिश कनेरिया म्हणाला, “सर्व काही हलक्यात घेतले जात आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची कामगिरी घसरत असून ते फक्त कर्णधार बदलत आहेत. असे करुन चालणार नाही, तुम्ही तुमच्या कर्णधाराला साथ दिली पाहिजे. एका वर्षासाठी कर्णधाराला जबाबदारी द्या, मग त्या एका वर्षात काय केले ते सांगण्यास सांगा. त्याला कोणीही काहीही बोलणार नाही, त्याला संपूर्ण पाठिंबा आहे, अशी हमी त्याला द्या. जर तुम्ही प्रदर्शन केले नाही तर तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. असे कठोर निर्णय घ्यावे लागतील. तुम्ही कठोर निर्णयच घेतले नाही, तर परिस्थिती बदलणार नाही.”

हेही वाचा – Mahaveer Phogat on Vinesh : ‘विनेशला राजकारणातच रस होता तर तिने…’, काका महावीर फोगट यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आता तिचा प्रचारही…

पाकिस्तानला गौतम गंभीरसारखा प्रशिक्षक हवा –

भारतासारखा देश यशस्वी आहे, असे कनेरियाचे मत आहे. कारण त्यांच्याकडे स्पष्टपणे बोलणारा गौतम गंभीरसारखा प्रशिक्षक आहे. तो म्हणाला, “इतर संघ चांगली कामगिरी का करत आहेत? भारतीय संघ चांगली कामगिरी का करत आहे? त्यांच्याकडे राहुल द्रविड होता ज्याने संघासह चांगले काम केले आणि आता त्यांच्याकडे गंभीर आहे. जो एक महान क्रिकेटर आणि चांगला माणूस आहे. तो स्पष्ट बोलतो. तो मागे न बोलता समोरच बोलतो. तुमच्याकडे अशी वृत्ती असावी. कारण तुम्हाला खंबीरपणे समोरच निर्णय घ्यायचे असतात.”