Danni Wyatt Hodge ENGW vs AUSW T20WC Final: लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाची अनुभवी फलंदाज डॅनी व्याट हॉजने मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला. आजवर क्रिकेट इतिहासात कोणतीच महिला खेळाडू अशी कामगिरी करू शकलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरताना वायट-हॉजचे लक्ष एका मोठ्या विक्रमावर होते आणि तिने सामन्याच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच तो विक्रम आपल्या नावे केला.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार सॉफी मॉलिन्यूने महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची नाणेफेक जिंकली आणि इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. डॅनी व्याट हॉज व अॅमी जॉन्स यांनी सावध सुरूवात केली, पण दोघीही ६ आणि ८ धावा करत माघारी परतल्या. यादरम्यान डॅनी व्याट हॉजने एक चौकार लगावताच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
महिला टी-२० विश्वचषकाच्या एका आवृत्तीत ३०० धावांचा टप्पा गाठणारी डॅनी व्याट-हॉज ही जगातील पहिली खेळाडू ठरली आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी तिला अंतिम सामन्यात केवळ सहा धावांची गरज होती. इंग्लंडच्या डावातील चौथ्या षटकात तिने आपली सहावी धाव पूर्ण करताच, संपूर्ण लॉर्ड्स स्टेडियम प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं. या कामगिरीसह तिने स्पर्धेच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णअक्षरांनी कोरलं आहे.
महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक सामने खेळलेली अनुभवी खेळाडू डॅनी व्याट-हॉज ही या संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरली आहे. या वर्षीच्या विश्वचषकात तिने खोऱ्याने धावा केल्या. व्याट-हॉजने स्पर्धेची अशी काही धडाकेबाज सुरुवात केली होती. पण अंतिम सामन्यात मात्र ८ धावा करत तिला माघारी परतावं लागलं.
महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत, डॅनी व्याट-हॉजने ऑस्ट्रेलियाची स्टार फलंदाज बेथ मूनीचा सहा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी, टी-२० विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीच्या नावावर होता; तिने २०२० च्या टी-२० विश्वचषकात सहा सामन्यांत एकूण २५९ धावा केल्या होत्या.
आयसीसी महिला टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज
३०२ धावा – डॅनी व्याट हॉज – इंग्लंड
२२६ धावा – नताली सायव्हर ब्रंट – इंग्लंड
२२५ धावा – तंझीम ब्रिट्स – दक्षिण आफ्रिका
२०८ धावा – डार्सी क्वार्टर – स्कॉटलंड
२०५ धावा – स्मृती मानधना – भारत
