बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होत आहे. या दौऱ्यात बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात दोन टेस्ट खेळणार आहे. यापैकी पहिला सामना डार्विन तर दुसरा सामना मॅके इथे होणार आहे. डार्विन इथल्या मरारा ओव्हल मैदानावर तब्बल २४ वर्षांनंतर सामना होणार आहे.

ऑस्ट्रेलियात पाच प्रमुख मैदानांवर टेस्ट मॅचेस होतात. यामध्ये सिडनी, मेलबर्न, ब्रिस्बेन, अ‍ॅडलेड आणि पर्थ यांचा समावेश आहे. पर्थ हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला आहे. तिथला टाईमझोनही वेगळा आहे. पर्थची खेळपट्टी जगातल्या सगळ्यात आव्हानात्मक खेळपट्ट्यांपैकी एक मानली जाते. चेंडूला मिळणारी प्रचंड उसळी, खेळपट्टीवर ठेवण्यात आलेलं गवत आणि फलंदाजांची उडणारी भंबेरी यामुळे पर्थ ही गोलंदाजांसाठी नंदनवन समजलं जातं. पर्थच्या वाकाऐवजी आता ऑप्टस मैदानावर सामने होतात. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड जी नावाने ओळखलं जातं. लाखाभरापेक्षा जास्त प्रेक्षकांना सामावून घेणाऱ्या या मैदानावर खेळणं अनोखा अनुभव असल्याचं खेळाडू सांगतात. सिडनी क्रिकेट ग्राऊंडचं मैदान हिरव्या रंगाच्या शैलीदार पॅव्हेलियनसाठी आणि फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीसाठी प्रसिद्ध आहे. सिडनीला प्रामुख्याने नव्या वर्षातल्या पहिल्या टेस्टचं आयोजन केलं जातं. अॅडलेडची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक मानली जाते. ब्रिस्ब्रेन हा ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला आहे. २०२१ मध्ये २८ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन इथली टेस्ट गमावली. २०००च्या दशकात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टेस्ट आयोजन पाच पारंपरिक केंद्रांपलीकडे नेण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत डार्विन आणि केर्न्स यांना टेस्ट मॅचचं आयोजन देण्यात आलं.

डार्विनच्या मरारा ओव्हल इथे २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया बांगलादेश टेस्ट खेळवण्यात आली. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. अष्टपैलू अँड्यू सायमंड्स या बैठकीला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. डार्विन इथे झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा डाव ९७ धावांतच गडगडला. ऑस्ट्रेलियाने डॅरेन लेहमन आणि कर्णधार स्टीव वॉ यांच्या शतकी खेळीच्या बळावर ४०७ धावांवर डाव घोषित केला. बांगलादेशचा दुसरा डाव १७८ धावांतच आटोपला. फिरकीपटू स्टुअर्ट मॅकगिलने ५ विकेट्स पटकावल्या. स्टीव वॉ याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

पुढच्याच वर्षी या मैदानावर ऑस्ट्रेलिया-श्रीलंका टेस्ट मॅच झाली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २०७ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे चामिंडा वासने ५ विकेट्स पटकावल्या. श्रीलंकेचा डाव ९७ धावांतच संपुष्टात आला. ग्लेन मॅकग्राने ५ विकेट्स घेत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडलं. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २०१ धावा केल्या. अ‍ॅडम गिलख्रिस्टने ८० धावा केल्या. श्रीलंकेला ३१२ धावांचं लक्ष्य मिळालं. श्रीलंकेचा दुसरा डाव १६२ धावांतच आटोपला. मायकेल कॅस्प्रोविझने ७ विकेट्स पटकावल्या.

टेस्टव्यतिरिक्त या मैदानावर ४ वनडे खेळवण्यात आल्या आहेत. वर्षभरापूर्वी या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दोन सामन्यांची टी२० मालिका इथे झाली होती. दोन्ही सामने एकतर्फी झाले. प्रायोगिक तत्वावर डार्विन आणि केर्न्सला आयोजन देण्यात आलं होतं. मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद यथातथाच राहिला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा प्रयोग बंद केला. त्यामुळे डार्विनला पुन्हा टेस्ट मॅचचं आयोजन देण्यात आलं नाही. आता तब्बल २२ वर्षांनंतर डार्विन इथे टेस्ट मॅच होणार आहे. १५,००० एवढी या स्टेडियमची क्षमता आहे. ड्रॉप इन पिचेसचा वापर करणारं पहिलं मैदान आहे. आंतरराष्ट्रीय मानकं पूर्ण करण्यासाठी ३ मिलिअन डॉलर्स खर्चून मैदानाचं नूतनीकरण करण्यात आलं आहे.