गेल्या महिन्यात दुबईत झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये अनसोल्डचा शिक्का माथी बसलेल्या डॅरेल मिचेलने भारताविरुद्धच्या मालिकेत वचपा काढला. ऑक्शनमध्ये दहापैकी एकाही संघाने स्वारस्य न दाखवलेल्या मिचेलने आपली ताकद भारतात येऊन दाखवली. इंदूर वनडेत मिचेलने सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली. मिचेलच्या शतकाच्या बळावर न्यूझीलंडने भारतासमोर ३३८ धावांचं लक्ष्य दिलं आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेत, मिचेलने दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं. बडोद्यात मिचेलने ८४ धावा केल्या. राजकोटमध्ये मिचेलच्या नाबाद १३१ धावांच्या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने तीनशेपेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला. आज इंदूर इथे सुरू असलेल्या लढतीत मिचेलने १३७ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली.

१६ डिसेंबर रोजी दुबईत झालेल्या आयपीएल ऑक्शनवेळी मिचेलची बेस प्राईज २ कोटी रुपये होती. मोठी खेळी करू शकण्याची क्षमता, फटकेबाजीची ताकद, उपयुक्त मध्यमगती गोलंदाज आणि अफलातून क्षेत्ररक्षक ही ओळख असूनही मिचेलला ताफ्यात घेण्यात कुठल्याच संघाने स्वारस्य दाखवलं नाही. अनेक माजी खेळाडूंनी मिचेलला न घेण्यावरून आश्चर्य व्यक्त केलं होतं.

२०२२ मध्ये मिचेल राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता. २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने तब्बल १४ कोटी रुपये खर्चून मिचेलला संघात घेतलं. १३ सामन्यात त्याने १४२.६०च्या स्ट्राईकरेटने ३१८ धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता. मिचेलची कामगिरी वाईट नव्हती मात्र चेन्नईची कामगिरी यथातथाच राहिली. बेन स्टोक्सऐवजी चेन्नईने मिचेलचा विचार केला. मात्र स्टोक्स विशेषज्ञ गोलंदाजाप्रमाणे गोलंदाजी करतो. मिचेल गोलंदाजीत तसं योगदान देऊ शकला नाही. त्यामुळे पुढच्या हंगामात चेन्नईने त्याला रिटेन केलं नाही.

भारताविरुद्ध वनडेत मिचेलने १३ सामन्यात ७४च्या सरासरीने ७४१ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतकं आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. २०२३ मध्ये मिचेलने धरमशाला इथे १३० धावांची खेळी केली होती. काही दिवसांनंतर वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये मिचेलने १३४ धावांची खेळी साकारली होती. भारताविरुद्ध त्याची बॅट तळपते.

३४वर्षीय मिचेल हा न्यूझीलंडच्या फलंदाजीचा आधारस्तंभ आहे. टेस्ट, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात खेळतो. फिरकीविरुद्ध खेळण्यासाठी आवश्यक तंत्र त्याच्याकडे आहे. ३५ टेस्ट, ५८ वनडे आणि ९० टी२० सामन्यात त्याने न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएलव्यतिरिक्त लाहोर क्वलँडर्स, टेक्सास सुपर किंग्स, लंडन स्पिरीट या संघांसाठीही तो खेळतो.