Dasun Shanaka apologizes to SL fans after Asia Cup final 2023 defeat: आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध श्रीलंकेचा संघाचा १० गडी राखून मोठा पराभव झाला. या पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका अत्यंत दु:खी आणि निराश झाला. भारतीय वेगवान गोलंदाजीसमोर श्रीलंका क्रिकेट संघ केवळ १५,२ षटकेच टिकू शकला. यादरम्यान त्यांनी केवळ ५० धावा केल्या आणि त्यानंतर टीम इंडियाने केवळ ६.१ षटकांत ५१ धावांचे लक्ष्य गाठून आठवा आशिया कप जिंकला. यानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराने दिलेल्या प्रतिक्रियेने श्रीलंकन चाहत्यांची मनं जिंकली. या सामन्यात कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ धावा केल्या, तर मोहम्मद सिराज (६/२१) समोर इतर फलंदाज टिकू शकले नाहीत. श्रीलंकेच्या संघाच्या चार फलंदाजांना तर दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. विशेष म्हणजे त्यांचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. दासुन शनाकाने श्रीलंकन चाहत्यांची मागितली माफी - दरम्यान, आशिया चषक २०२३ च्या फायनलमध्ये भारताविरुद्ध श्रीलंकन संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर दासुन शनाकाने आपल्या सर्व चाहत्यांची माफी मागितली. त्याचबरोबर स्पर्धेतील पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. तो पुढे म्हणाला की, श्रीलंका क्रिकेट संघ आपल्या चाहत्यांवर खूप प्रेम करतो. तसेच विजेतेपद जिंकल्याबद्दल भारताचे अभिनंदन. हेही वाचा - Asia Cup जिंकल्यानंतर मध्यरात्री मुंबईत पोहोचला रोहित शर्मा, सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी केली गर्दी, पाहा VIDEO दासून शनाका सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला, "मला श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. आम्ही तुम्हाला निराश केले याबद्दल माफ करा. मी खरोखर दुःखी आणि निराश आहे. आम्हा सर्व खेळाडूंचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. भारतीय क्रिकेट संघ खेळत असलेला क्रिकेटचा ब्रँड विलक्षण आहे. त्यामुळे जेतेपद पटकावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली. त्याने खेळपट्टीवर ज्या प्रकारे चमकदार कामगिरी केली, त्याचे श्रेय त्याला जाते." दासून शनाका श्रीलंका क्रिकेट संघाच्या कामगिरीवर खूश - दासून शनाका पुढे म्हणाला, मला वाटले की ही खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली असेल, पण ढगाळ वातावरणामुळे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरला. हा आमच्यासाठी खूप कठीण दिवस होता. आमच्या फलंदाजांचा दृष्टीकोन अधिक चांगला होऊ शकला असता, आमचे तंत्र थोडे अधिक चांगले होऊ शकले असते, यात शंका नाही. या स्पर्धेत आमच्यासाठी सकारात्मक बाब म्हणजे सदिरा समरविक्रमा आणि कुसल मेंडिस यांनी फिरकीच्या परिस्थितीत चांगली फलंदाजी केली. हेही वाचा - Asia Cup Final 2023: “आता सिराजलाच विचारा की…”; वेगवान गोलंदाजाच्या कामगिरीने बॉलीवूड अभिनेत्री झाली प्रभावित श्रीलंकेचा कर्णधार म्हणाला, चरित असलंकाने ज्याप्रकारे फलंदाजी केली आणि तो दबाव चांगल्या प्रकारे हाताळत आहे, हे कौतुकास्पद आहे. हे तिघे भारतात चांगली कामगिरी करतील आणि भरपूर धावा करतील. याशिवाय आगामी विश्वचषक २०२३ मध्ये दुनिथ वेल्लागे, महेश तिक्षाना, मथिशा पाथिराना, कसून रजिथा आणि प्रमोद मदुशन हे देखील चांगली कामगिरी करतील असे मला वाटते. आमच्या पाच प्रमुख खेळाडूंशिवायही आम्ही आशिया चषक २०२३ मध्ये इतके चांगले क्रिकेट खेळलो आणि अंतिम फेरी गाठली. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आमच्यासाठी हा एक चांगला संकेत आहे.