Dasun Shanaka Creates History in T20 WC 2026: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये श्रीलंका आणि ओमान यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना यंदाच्या टी-२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. या मोठ्या धावसंख्येचे श्रेय श्रीलंकेचे फलंदाज पवन रत्नायके, कर्णधार दासुन शनाका व कुसल मेंडिस यांना जातं. ज्यांनी वादळी अर्धशतकी खेळी केल्या. यादरम्यान कर्णधार दासुन शनाकाने इतिहास घडवला.

श्रीलंकेतील पल्लेकले येथे होत असलेल्या या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो संघासाठी बिलकुल फायदेशीर ठरला नाही. ओमानच्या गोलंदाजांनी सुरूवात दणक्यात केली, पण नंतर श्रीलंकेच्या मधल्या फळीने मात्र गोलंदाजांची धुलाई केली. कुसल मेंडिसने ४५ चेंडूत ७ चौकारांसह ६१ धावा केल्या. तर वानिंदु हसरंगाच्या जागी संधी मिळालेल्या युवा फलंदाज पवन रत्नायकेने संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.

पवन रत्नायकेला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने २८ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह झटपट ६० धावांची खेळी केली. यानंतर आलेल्या कर्णधार दासुन शनाकाने तर धावांचा पाऊस पाडला. त्याने षटकारांचा पाऊस पाडत २० चेंडूत ५० धावा केल्या. शनाकाने ५ षटकार व २ चौकारांसह ही कामगिरी केली. तर कामिंदु मेंडिसने ७ चेंडूत १९ धावा करत संघाला २०० अधिक धावांचा डोंगर उभारला. यासह श्रीलंकेने २० षटकांत ५ बाद २२५ धावांचा डोंगर उभारला. यंदाच्या टी-२० विश्वचषकातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

दासुन शनाकाने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावलं आणि पुढच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. यासह दासुन शनाका टी-२० इतिहासात १९ चेंडूत अर्धशतक करणारा श्रीलंकेचा पहिला खेळाडू ठरला आहे.

श्रीलंकेसाठी टी-२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक (चेंडूद्वारे)

१९ चेंडू – दासुन शनाका विरूद्ध ओमान, पल्लेकेले, टी-२० वर्ल्डकप २०२६
२० चेंडू – दासुन शनाका विरुद्ध भारत, पुणे,
२१ चेंडू – एम जयवर्धने विरुद्ध केईएन, जोहान्सबर्ग, २००७ वर्ल्डकप
२१ चेंडू – कुमार संगकारा विरुद्ध भारत, नागपूर</p>