२०१९ मध्ये #MeToo प्रकरण गाजल्याचं साऱ्यांनाच आठवत असेल. या अंतर्गत अनेक महिलांनी आपल्यावर भूतकाळात झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटना शेअर केल्या. त्यात बॉलिवूडमधील काही नावांचाही समावेश होता. या #MeToo प्रकरणानंतर आता #SpeakingOut नावाची एक नवी मोहिम ट्विटरवर सुरू झाली असून यात विविध महिला आपल्यावरील शोषणाबाबत कहाणी शेअर करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘स्पीकिंग आऊट’ ट्रेंड होत आहे. या मोहिमेमध्ये आतापर्यंत बर्‍याच महिलांनी आपले कटू अनुभव शेअर केले असून विशेषत: त्या महिलांनी WWE, NWA आणि इतर रेसलिंग लीग संघटनांच्या पदाधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

महिला रेसलर लिज सीवेज नेदेखील #SpeakingOut या मोहिमेअंतर्गत आपल्यासोबत घडलेल्या गोष्टी ट्विटरवरून शेअर केल्या. लिज हिने नॅशनल रेसलिंग अलायन्स (NWA) चे उपाध्यक्ष डेव लगाना यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. त्या आरोपानंतर लगाना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. NWA ने आपल्या ट्विटरवर जाहीर केले की उपाध्यक्ष लगाना यांचा राजीनामा तात्काळ प्रभावाने मंजूर करण्यात आला आहे.

लिजने ट्विटरवर तिची कहाणी पोस्ट केली. तिने लिहिले, “मी #SpeakingOut मध्ये सहभागी होत आहे. रेसलिंग जगतात कॅलिफोर्निया सोडल्यावर जे घडले ते मी तुम्हाला सांगते आहे. माझ्या जीवनातील इतकी मोठी गोष्ट सांगण्यास मला उशीर झाल हे मला मान्य आहे, पण आता बोलण्याचे धाडस करत आहे. लगान आणि मी चार वर्षे मित्र होतो. त्यानंतर त्याने माझे लैंगिक शोषण केले. त्याने सुमारे दोन वर्षे सातत्याने विनंती केल्यानंतर मी लॉस एंजेल्सला आले. मी त्याच्या पडत्या काळात त्याला साथ दिली, त्यामुळे मी त्याची एक चांगली मैत्रिण झाले. त्यानेही ते मान्य केलं. मी कामासाठी लॉस एंजेल्सला गेल्यावर आर्थिक चणचण असल्याने त्याच्यासोबत राहायचे. सुरूवातीला त्याने काहीही वाईट गोष्ट केली नाही.”