ग्लॉस्टर : इंग्लंडसाठी खेळलेले पहिले कृष्णवर्णीय क्रिकेटपटू डेव्हिड लॉरेन्स यांचे रविवारी निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. भारताविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूंनी मिनिटभर टाळ्या वाजवून लॉरेन्स यांना आदरांजली वाहिली.
लॉरेन्स हे ‘सीड’ नावाने प्रसिद्ध होते. क्रिकेट कारकीर्द असो वा आयुष्य प्रत्येक आव्हानाला त्यांनी समर्थपणे तोंड दिले. अखेरच्या काळात मोटर न्यूरॉन या आजाराशीही त्यांनी झुंज दिली. अखेरपर्यंत इतरांना प्रोत्साहन देणे आणि दुसऱ्याचा विचार करणे ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती.
वेगवान गोलंदाज लॉरेन्स १९८८ ते १९९२ या कालावधीत पाच कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी १८ गडी बाद केले. वेलिंग्टनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजी करताना जोरात पडल्याने त्यांच्या गुडघ्याला जबर दुखापत झाली आणि वयाच्या २८व्या वर्षीच त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली. कौंटी क्रिकेटमध्ये ग्लॉस्टरशायरसाठी त्यांनी २८० सामन्यांत ६२५ गडी बाद केले. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर त्यांनी शरीरसौष्ठवपटू म्हणून स्वत:ला घडवले.