आयपीएल २०२६ स्पर्धेतील २६ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दिल्लीकडून डेव्हिड मिलरने तुफान फटकेबाजी केली. दिल्लीने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला. दिल्लीचा संघ या सामन्यात १७६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. शेवटच्या २ षटकात २५ धावांची गरज असताना तेव्हा डेव्हिड मिलरचे रौद्ररूप पाहायला मिळाले. शेवटच्या षटकात त्याने २ षटकार आणि एक चौकार मारून दिल्लीला विजय मिळवून दिला. यादरम्यान त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

डेव्हिड मिलरने २० व्या षटकात धावांचा पाठलाग करताना २ खणखणीत षटकार खेचले. यासह त्याने कायरन पोलार्डचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. डेव्हिड मिलर हा धावांचा यशस्वी पाठलाग करताना २० व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. २० व्या षटकात फलंदाजी करताना डेव्हिड मिलरने २६ चेंडूत ९ षटकार खेचले आहेत. या यादीत एमएस धोनी अव्वल स्थानी आहे. धोनीने २० व्या षटकात फलंदाजी करताना १४ षटकार खेचले आहेत. तर यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या कायरन पोलार्डच्या नावे ७ षटकार खेचण्याची नोंद आहे.

आयपीएलमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना २० षटकात सर्वाधिक षटकार खेचणारे फलंदाज

एमएस धोनी – १४ षटकार (५७ चेंडूत)

डेव्हिड मिलर – ९ षटकार (२६ चेंडूत)

कायरन पोलार्ड – ७ षटकार (२२ चेंडूत)

दिल्लीचा दमदार विजय

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांअखेर ८ गडी बाद १७५ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फिल सॉल्टने ६३ धावांची खेळी करून दमदार सुरुवात करून दिली. तर विराट कोहलीने १९ धावा केल्या. देवदत्त पडिक्कलने १८ धावांचे योगदान दिले. टीम डेव्हिडने २६ धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना केएल राहुलने ५७ धावा केल्या. शेवटी अक्षर पटेल २६ धावा करून रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला. ट्रिस्टन स्टब्स ६० धावांवर नाबाद राहिला. तर शेवटी डेव्हिड मिलरने नाबाद २२ धावांची खेळी केली.