David Miller on Tristan Stubbs: डेव्हिड मिलरच्या अखेरच्या षटकातील फटकेबाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने रोमांचक सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा ६ गडी राखून पराभव केला. केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी अर्धशतकं झळकावली, तर डेव्हिड मिलरने शेवटच्या षटकात सलग दोन षटकार मारून दिल्लीला आरसीबीवर विजय मिळवण्यास मदत केली. डेव्हिड मिलर यंदाच्या आयपीएलमध्ये झालेल्या गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला होता. पण या सामन्यात त्याने विजय मिळवून दिल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घेऊया.
डेव्हिड मिलरने अखेरच्या षटकात दिल्ली विजयासाठी १४ धावांची गरज असताना तिसऱ्या, चौथ्या चेंडूवर षटकार खेचत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. यानंतर पाचव्या चेंडूवर एका धावेची गरज असताना त्याने चौकार लगावत संघाला ६ विकेट्स आणि एक चेंडू राखत विजय मिळवून दिला.
संघाला सामना जिंकून दिल्याबद्दल कसं वाटतंय असं विचारल्यानंतर मिलर म्हणाला, “खूप छान वाटतंय. काही दिवसांपूर्वीची त्या इनिंगनंतर आता संघाला विजय मिळवून दिल्यानंतर छान वाटतंय. पण दोन-तीन सामन्यांपूर्वी मी थोडा निराश होतो. त्यामुळे पुन्हा त्या परिस्थितीत स्वतःला उभं करणं आणि संघाला विजय मिळवून देणं खूप समाधानकारक आहे.”
गुजरातविरुद्धचा सामना अजूनही डोक्यात होता का?, या प्रश्नाचा उत्तर देताना तो म्हणाला, “हो, खरं सांगायचं तर तो विचार मनात राहतोच, जोपर्यंत तुम्ही त्या स्थितीत सामना पुन्हा जिंकत नाही. मध्ये एक आठवड्याचा ब्रेक मिळाला, त्यामुळे काही गोष्टींवर काम केलं आणि वर्तमानात राहून आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. माझ्या पहिल्या सहा चेंडूंमध्ये मी पाहिलं त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. सलग सहा यॉर्कर्स टाकले आणि मला फटके खेळता आले नाही. पण शेवटच्या सहा चेंडूंमध्ये गोष्टी जुळून आल्या याचा खूप आनंद आहे.”
“आमचा नेहमी अखेरच्या षटकांमध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न नसतो. पण जेव्हा शेवटच्या चार षटकांत ४०च्या आसपास धावा हव्या असतात, तेव्हा एक-दोन षटकार लागणार हे आम्हाला माहित असतं. एकदा तुम्ही षटकार मारला आणि लगेचच पुढे चौकार किंवा आणखी एक षटकार आला, की गोलंदाजावर लगेच दबाव येतो. म्हणून आमचा प्रयत्न फक्त डॉट बॉल्स कमी खेळण्याचा होता आणि जेव्हा बाउंड्री मारण्याची संधी मिळेल, तेव्हा त्याचा पूर्ण फायदा घ्यायचा. त्यामुळे शांत राहणं, जोडीदाराशी सतत संवाद ठेवणं आणि सामना शक्य तितका शेवटपर्यंत नेण्यावर आमचा भर होता,” असं मिलर पुढे म्हणाला.
डेव्हिड मिलरला ट्रिस्टन स्टब्स फलंदाजीदरम्यान काय म्हणाला?
हो, मी ज्या क्रमांकावर फलंदाजीला आलो, तेव्हा या सामन्यात बऱ्याच वेळा व्यत्यय आला होता. खेळात लय सापडत नव्हती आणि मध्ये मध्ये ब्रेकही लागत होते. त्यामुळे थोडा गोंधळ वाटत होता. पण मी क्रीजवर आलो तेव्हा स्टब्सने मला सांगितलं की, ‘तुझी इन्टेन्सिटी हाय ठेव.’ माझ्यासाठी ते खूप उपयोगी ठरलं. त्याच्या या वाक्यामुळे मी पुन्हा योग्य मानसिकतेत आलो आणि खेळावर लक्ष केंद्रित करू शकलो.”
सामना जिंकल्यानंतर स्टब्सबरोबर काय बोलणं झालं, याबाबत मिलरने सांगितलं, “हो, स्टब्ससोबत मॅच फिनिश करणं नेहमीच छान वाटतं. आम्ही खूप वेळा एकत्र फलंदाजी केली आहे. तो मला म्हणाला, ‘खूप धन्यवाद, तू मला वाचवलंस.’ पण माझ्या मते त्याने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने संपूर्ण डाव सांभाळला, शांतपणे खेळला. त्याच्याकडे उत्कृष्ट टेक्निक आहे आणि तो खूप शक्तिशाली फटकेही मारू शकतो. त्यामुळे त्याचं क्रीजवर असणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.” दिल्ली कॅपिटल्स संघाने विजयानंतर गुणतालिकेत चौथं स्थान गाठलं आहे.
