David Miller on India Defeat IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने अहमदाबादमध्ये सुपर-८ सामन्यात भारतावर ७६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात मानहानीकारक पराभव करत २०२४ टी-२० वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा व्याजासकट बदला घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाचा हिरो डेव्हिड मिलर ठरला, ज्याने ६३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताविरूद्धच्या विजयानंतर डेव्हिड मिलरने भारताला “पराभूत करता येण्यासारखा संघ” असल्याचं स्पष्ट शब्दांत म्हटलं.
सामनावीर ठरलेल्या अनुभवी डेव्हिड मिलरने सांगितले की, अचूक अंमलबजावणी आणि आखलेल्या रणनितीवर ठाम राहिल्यामुळेच त्यांनी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील अपराजित भारतीय संघाला पराभूत केलं. मिलरच्या कमालीच्या फटकेबाजीनंतर द. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजीला सुरूंग लावला आणि कोणताच फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.
टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारताची अपराजित मालिका या सामन्यात खंडित झाली. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत दक्षिण आफ्रिकेने शिस्तबद्ध आणि प्रभावी कामगिरी केली. मिलरची संयमित पण आक्रमक खेळी या ऐतिहासिक विजयाचा कणा ठरली. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत भारतासारख्या संघाविरुद्धच्या या मोठ्या विजयाचा अर्थ काय, असा प्रश्न मिलरला विचारण्यात आला.
भारताला पराभूत केल्यानंतर काय म्हणाला डेव्हिड मिलर?
त्यावर मिलर म्हणाला, “भारत हा पराभूत करता येईल असा संघ आहे, हे दाखवून दिलं. ते अतिशय ताकदवान संघासह स्पर्धेत उतरतात, हे मी आधीही म्हटलं आहे. पण अशा स्पर्धेत आमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे साध्या गोष्टींवर लक्ष ठेवणं, प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणं आणि दिलेलं काम पूर्ण करणं.”
तो पुढे म्हणाला, “आमचा संघ परिपक्व आहे. अनेक खेळाडूंनी एकत्रितपणे बराच काळ क्रिकेट खेळलं आहे आणि दबावाच्या क्षणी तो अनुभव उपयोगी पडतो. आपल्या भूमिकेत राहून कामगिरी करणं आणि नेहमी अधिक चांगलं करण्याची भूक ठेवणं, हेच आमचं बळ आहे.”
हा पराभव भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धावांच्या फरकाने झालेल्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव ठरला, तर टी-२० विश्वचषक इतिहासातील हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. सुपर-८ टप्प्याच्या सुरुवातीलाच बसलेला हा मोठा फटका भारतासाठी निश्चितच चिंतेचा विषय ठरला आहे.
भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी सुपर-८मधील पुढील दोन सामने झिम्बाब्वे व वेस्ट इंडिज यांच्याविरूद्ध खेळवले जाणार आहेत. जर संघाला सेमीफायनल गाठायची असेल तर या दोन्ही संघांना पराभूत करणं गरजेचं असेल. फक्त पराभव नाही तर टीम इंडियाला मोठ्या फरकाने विजय मिळवण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांचा नेट रन रेट सुधारेल आणि इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागणार आहे.
