David Miller 2 Mistakes In DC vs GT Match: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक सामना रंगला. दिल्लीकडून स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. पण शेवटच्या षटकातील शेवटच्या २ चेंडूंवर केलेल्या चुका दिल्ली कॅपिटल्सला चांगल्याच महागात पडल्या. जर त्याने पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली असती, तर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता. पण असं झालं नाही. यासह क्षेत्ररक्षण करतानाही त्याच्याकडून मोठी चूक झाली, जी दिल्ली कॅपिटल्स संघाला चांगलीच महागात पडली.
शेवटच्या षटकातील शेवटच्या ३ चेंडूंवर दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी ३ चेंडूत ८ धावांची गरज होती. त्यावेळी डेव्हिड मिलरने प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर १०६ मीटर लांब षटकार खेचला. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी २ चेंडूत २ धावा करायच्या होत्या. मिलरने पाचव्या चेंडूवर फाईन लेगच्या दिशेने फटका मारला, तो धावून सहज एक धाव पूर्ण करू शकला असता. कुलदीप यादव अर्ध्या क्रिझपर्यंत आला होता, पण त्याने कुलदीपला परत पाठवलं आणि धाव घेणं टाळलं. जर त्याने ती धाव पूर्ण केली असती, तर सामना सुपर ओव्हरमध्ये जाऊ शकला असता.
पाचवा चेंडू निर्धाव राहिल्यानंतर डेव्हिड मिलरवरील दबाव वाढला. कारण आता दिल्लीला विजयासाठी एका चेंडूत २ धावा करायच्या होत्या. त्यामुळे दबाव पूर्णपणे डेव्हिड मिलरवर होता. या दबावाचा फायदा प्रसिध कृष्णाने घेतला. त्याने स्लोव्हर चेंडू टाकला. मिलरने जोरात बॅट फिरवली, पण चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नाही. त्यामुळे कुलदीप यादव धावबाद झाला आणि दिल्लीने हा सामना गमावला. कुलदीप यादव देखील फलंदाजी करू शकतो. एका चेंडूत एका धावेची गरज असताना, गोलंदाजावरही दबाव असतो. त्यामुळे दोघांना विजयाची समान संधी होती. पण मिलरने कुलदीपला स्ट्राईक दिलीच नाही. शेवटचा चेंडू निर्धाव राहिल्याने गुजरातने हा सामना जिंकला.
पहिल्या डावात केलेली चूक महागात पडली
डेव्हिड मिलर दुखापतग्रस्त होता, त्याच्या हाताला दुखापत असतानाही त्याने मोठे फटके मारुन दिल्लीला सामन्यात टिकवून ठेवलं. दरम्यान पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करतानाही त्याच्याकडून मोठी चूक झाली, जी दिल्लीला चांगलीच महागात पडली. १४ व्या षटकात डेव्हिड मिलरकडून शुबमन गिलचा कॅच सुटला. त्यावेळी तो ४३ धावांवर फलंदाजी करत होता. ज्यावेळी कॅच सुटला, त्यावेळी संघाची धावसंख्या १४२ धावा इतकी होती. जर तो कॅच पकडला असता, तर गुजरातने कदाचित २०० धावांचा पल्ला गाठला नसता. गिलने शेवटी आक्रमक फलंदाजी केली आणि ४५ चेंडूत ७० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर गुजरातने ४ गडी बाद २१० धावा केल्या.
