बाद फेरीच्या दृष्टीने पंजाबविरुद्ध हैदराबादची कसोटी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील सनरायजर्स हैदराबादच्या अभियानात आणखी एका विजयाची महत्त्वपूर्ण भर घालून मायदेशी परतण्याचा निर्धार डेव्हिड वॉर्नरने केला आहे. सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबशी सामना करताना हैदराबादला मधल्या फळीतील फलंदाजीची प्रमुख चिंता आहे.

हैदराबाद आणि पंजाब या दोन्ही संघांनी प्रत्येकी ११ सामन्यांतून पाच विजयांसह १० गुण कमावले आहेत. फक्त सरस धावगतीआधारे हैदराबाद पाचव्या आणि पंजाब सहाव्या स्थानावर आहेत. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांद्वारे अखेरच्या स्थानावर दावेदारी करण्याची संधी त्यांना आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या तयारीसाठी स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस यांच्यासह वॉर्नर ऑस्ट्रेलियात परतणार आहे. मात्र चेंडू फेरफारप्रकरणी बंदी उठल्यानंतर वॉर्नरने ‘आयपीएल’मध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीचा आविष्कार दाखवला. वॉर्नरच्या खात्यावर ६११ धावा जमा असून, सर्वाधिक एकूण धावांसाठीची ‘ऑरेंज कॅप’सुद्धा त्याच्याकडे आहे. या यादीतील दुसऱ्या स्थानावरील फलंदाज जॉनी बेअरस्टो (४४५ धावा) आधीच मायदेशी परतला आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांना आव्हानात्मक ठरणारी सलामीची जोडी फुटल्यामुळे मागील दोन सामन्यांत हैदराबादला समस्या जाणवत आहे. त्यांच्या पाचही विजयांत सलामीच्या जोडीचा सिंहाचा वाटा आहे, तर मधल्या फळीतील फलंदाजांची हाराकिरी आणि अखेरच्या षटकांमधील गोलंदाजी यामुळे पराभव पत्करले आहेत. कर्णधार केन विल्यम्सनसुद्धा दुखापतींमुळे बऱ्याच सामन्यांमध्ये खेळू शकला नाही.

रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ महत्त्वाच्या क्षणी संघाची कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. अश्विन आणि मोहम्मद शमी हैदराबादच्या मधल्या फळीसाठी आव्हानात्मक ठरतील. हैदराबादप्रमाणेच पंजाबच्या फलंदाजांनीही यंदाच्या हंगामात छाप पाडली आहे. सलामीवीर ख्रिस गेल (४४४ धावा) आणि लोकेश राहुल (४४१ धावा), मयांक अगरवाल (२६२ धावा), डेव्हिड मिलर (२०२ धावा) आणि सर्फराज खान (१८० धावा) यांच्यासारखे फलंदाज त्यांच्याकडे आहेत.

  • सामन्याची वेळ: रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १