David Warner Reaction On Fight In PSL: पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत गुरूवारी झालेल्या सामन्यात कराची किंग्ज आणि रावलपिंडी या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात रावलपिंडी संघाने कराची किंग्जसमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कराची किंग्जने १९८ धावांचा यशस्वी पाठलाग करून ५ गडी राखून विजयाची नोंद केली. हा सामना झाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि इंग्लंडचा अनुभवी खेळाडू मोईन अली हे दोघेही भांडताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच, या दोघांमध्ये भांडण का झालं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

डेव्हिड वॉर्नर हा कराची किंग्ज संघाचा कर्णधार आहे. सोशल मीडियावर १४ सेंकदाचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात डेव्हिड वॉर्नर आपल्या संघातील सहखेळाडू मोईन अलीला रागात काहीतरी बोलताना दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वॉर्नर मोईन अलीवर नाराज असल्याचं दिसून येत आहे. तसेत कराची किंग्ज संघाचे टीम डायरेक्टर हैदर अजहर डेव्हिड वॉर्नरला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

डेव्हिड वॉर्नर काय म्हणाला?

दोघांमध्ये वाद झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यामुळे एकच चर्चा रंगली की, नेमकं झालंय तरी काय? डेव्हिड वॉर्नरने एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करून नेमकं काय झालं, याबाबत खुलासा केला आहे. वॉर्नरने लिहिले की, मी हैदरला म्हटलं, जा आणि हस्तांदोलन करा..” तसेच आणखी एक पोस्ट रिपोस्ट करत त्याने लिहिले की, “हे खोटं आहे, दोघेही माझी मस्करी करत होते…” डेव्हिड वॉर्नरने व्हिडीओ शेअर करुन स्पष्ट केलं आहे की, हा व्हिडीओ खोटा आहे.

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात कराची किंग्ज संघाने रावलपिंडीवर ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात कराची किंग्ज संघाने १९८ धावांचा यशस्वी पाठलाग केला. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार डेव्हिड वॉर्नरने दमदार अर्धशतकी खेळी केली. तर आजम खानने ३४ चेंडूत ७४ धावा करून संघाचा विजय निश्चित केला.