ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने ज्या दिवसापासून मैदानात पुनरागमन केले आहे, तेव्हापासून त्याला चाहत्यांच्या टीकांना आणि टिंगलटवाळीला सामोरे जावे लागले आहे. जगतील कोणतेही स्टेडियम असो, वॉर्नर जेथे जेथे खेळला, तेथे त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली. विश्वचषक स्पर्धा असो किंवा अ‍ॅशेस मालिका असो, त्याला कायम हिणवण्यात आले. अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या सामन्यातही असाच एक प्रकार घडलेला पाहायला मिळाला.

वॉर्नर आणि ऑस्ट्रेलियाचे इतर खेळाडू मैदानावर जाण्यासाठी ड्रेसिंग रूममधून खाली उतरत होते. ज्यावेळी वॉर्नर ड्रेसिंग रूममधून बाहेर आला, तेव्हा एका चाहत्याने त्याला ‘चीटर’ असे हिणवले. तसेच त्याच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. पण वॉर्नर मात्र त्याच्यावर अजिबात चिडला नाही. एक विशिष्ट प्रकारचा आवाज करत आणि दोन्ही हात वर करून त्याने त्या टीकेकडे दुर्लक्ष केले.

त्याने दिलेलं हे उत्तर नेटकऱ्यांना भन्नाट आवडलं. अनेक नेटकऱ्यांनी त्याचे या उत्तरासाठी कौतुकही केले. दरम्यान, यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेत वॉर्नरला सात डावांत केवळ एक अर्धशतक ठोकता आले. मात्र स्मिथने दमदार पुनरागमन २ शतके आणि १ अर्धशतके ठोकली आहेत.