वानखेडेवर रंगलेल्या आयपीएल2021च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जवर सहज सरशी साधली. या सामन्यात दिल्लीकडून शिखर धवनने 54 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 85 धावा फटकावल्या. या कामगिरीसह त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

 

आयपीएलच्या इतिहासात 600 चौकार मारणारा धवन पहिला फलंदाज ठरला आहे. धवननंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सनरायजर्स हैदराबादचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आहे. त्याच्या खात्यात 510 चौकार आहेत. या यादीत आरसीबीचा कर्णधार विराट कोहली तिसर्‍या क्रमांकावर आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे, पण चौकारांच्या बाबतीत तो धवनपेक्षा खूपच मागे आहे. त्याने आतापर्यंत 507 चौकार ठोकले आहेत.

चौथ्या क्रमांकावर ‘मिस्टर आयपीएल’ म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना आहे. गेल्या हंगामात रैना खेळू शकला नाही. 2018मध्ये अखेरचा आयपीएल सामना खेळणार्‍या कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्लीचा माजी कर्णधार गौतम गंभीरने या यादीत पाचवे स्थान कायम राखले आहे. त्याच्या नावावर 491 चौकार आहेत.

पंतसेनेची धोनी आर्मीवर मात

शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सने अनुभवी चेन्नई सुपर किंग्जवर 7 गड्यांनी सहज मात दिली. दिल्लीचा नवा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजी करू दिली. सुरेश रैनाची अर्धशतकी खेळी आणि सॅम करनच्या झटपट धावांमुळे चेन्नईने दिल्लीसमोर 20 षटकात 7 बाद 188 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात दिल्लीच्या सलामीवीरांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत दिल्लीचा विजय सोपा केला. सामन्यात 85 धावांची खेळी केलेल्या शिखर धवनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.