IPL 2026 MI vs DC Highlights in Marathi: समीर रिझवीच्या ९० धावांच्या वादळी खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का दिला आहे. दिल्लीने मुंबईचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने संघाचं नेतृत्त्व केलं. सूर्याने पुढे येत अर्धशतकी खेळा केली होती, पण संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरल्याने संघाला पराभवाचा धक्का बसला. समीर रिझवीने ५१ चेंडूत ७ चौकार व ७ षटकारांसह ९० धावांची खेळी केली आणि मुंबई इंडियन्सला चांगलाच भारी पडला.

मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६२ धावा करण्यात यशस्वी ठरला. तर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने समीर रिझवीच्या खेळीच्या बळावर १८.१ षटकांत ४ बाद १६४ धावा करत सामना आपल्या नावे केला आहे. दिल्लीच्या स्लो खेळपट्टीवर धावा करणं सोपं नव्हतं, त्यात गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांना धावा करण्याची फारशी संधी दिली नाही. दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या मोसमातील हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह दिल्लीचा संघ आयपीएल २०२६च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

मुंबईने दिलेल्या १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात खूप खराब झाली. केएल राहुल १ धाव तर नितीश राणा शून्यावर बाद झाले. पण समीर रिझवी व पथुम निसांका यांनी संघाचा डाव सावरला. निसांका ३० चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ४४ धावा करत बाद झाला. यानंतर समीर रिझवीने एकट्याने संघाला विजयापर्यंत नेलं. तर डेव्हिड मिलर एका टोकाकडून मैदानावर कायम राहत त्याला चांगली साथ दिली. रिझवी ९० धावा करत बाद झाला. मुंबईकडून मिचेल सँटनर, दीपक चहर व कार्बिन बॉश यांनी १-१ विकेट्स घेतल्या. तर बुमराहने आपल्या रॉकेट थ्रोवर नितीश राणाला धावबाद केलं होतं.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी पाचारण केलं. रायन रिकल्टन व तिलक वर्मा तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर रोहित शर्मा व कुलदीप यादव यांनी संघाचा डाव सावरला. रोहित शर्मा व सूर्याने अर्धशतकी भागीदारी साकारली. रोहित शर्मा २६ चेंडूत ५ चौकार व एका षटाकारासह ३५ धावा करत बाद झाला. तर सूर्याने ३६ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह अर्धशतकासह ५१ धावा करत बाद झाला. यानंतर नमन धीर, मिचेल सँटनर व कार्बिन बॉश यांनी संघाला कसंबसं १६२ धावांपर्यंत नेलं.

दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारने २ विकेट्स घेतल्या. तर लुंगी एनगिडी, अक्षर पटेल, विपराज निगम व टी नटराजन यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.