IPL 2026 DC vs RR Match Highlights in Marathi: दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा ५ विकेट्स पराभव केला आहे. या पराभवासह राजस्थान रॉयल्सला प्लेऑफच्या शर्यतीत मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा संघ पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानी घसरला आहे. तर दिल्लीने एका स्थानाची झेप घेतली. दिल्लीच्या या विजयामुळे प्लेऑफच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट आला आहे. पंजाब किंग्ससाठी देखील राजस्थानच्या पराभवामुळे प्लेऑफ गाठण्याची चांगली संधी आहे. राजस्थानकडे दोन सामने शिल्लक असून संघाने या दोन सामन्यात विजय मिळवला आणि इतर संघांचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्यास संघ प्लेऑफ गाठू शकतो.

१८ चेंडूत दिल्लीाल ३५ धावांची गरज असताना कर्णधार रियान परागने मोठा डाव खेळला आणि त्याने डोनावर फरेराला गोलंगाजीची संधी दिली. त्याच्या गोलंदाजीवर मिलर व अक्षरने २ षटकार लगावत १६ धावा कुटल्या. यानंतर अखेरच्या २ षटकांत १९ धावांची गरज असताना मिलर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर आशुतोष शर्मा फलंदाजीला आला, बृजेशने १९वं षटक चांगलं टाकलं होतं, पण आशुतोषने पाचव्या चेंडूवर षटकार खेचला. अखेरच्या षटकात दिल्लीला ७ धावांची गरज होती. एडम मिल्नेकडे अखेरचं षटक टाकण्याची जबाबदारी होती. त्याच्या पहिल्याच दोन चेंडूंवर आशुतोष शर्माने षटकार खेचत सामना दिल्लीच्या नावे केला.

मिचेल स्टार्कचं १५वं षटक ठरलं सामन्याचा टर्निंग पॉईंट

फलंदाजीत दिल्लीने चांगली सुरूवात केली, पण सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला ते म्हणजे मिचेल स्टार्कचं १५वं षटक. १४ षटकांत राजस्थानचा संघ १६१ धावांवर खेळत होता. स्टार्कने या षटकात ३ विकेट्स घेत राजस्थानला २०० धावांच्या आत रोखण्यात मोठी भूमिका बजावली. स्टार्कने या षटकात रियान पराग, डोनावन फरेरा व रवि सिंह या तीन फलंदाजांना बाद करत सामना दिल्लीच्या बाजूने बळवला.

राजस्थानने दिलेल्या १९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक पोरेल व केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६१ चेंडूत १०५ धावांची भागीदारी साकारली. अभिषेक पोरेलने ३१ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ५१ धावांची खेळी करत बाद झाला. तर केएल राहुलने ४२ चेंडूत १ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावा केल्या. साहिल पारेख ९ धावा करत बाद झाला. तर स्टब्सला ४ धावांवर माघारी धाडलं.

स्टब्स बाद झाल्यानंतर मिलरने येताच एक षटकार खेचला आणि संघावरचं दडपण कमी केलं. पण मिलर ९ धावा करत बाद झाला. यानंतर कर्णधार अक्षर पटेल व आशुतोष शर्मा यांनी संघाला विजय मिळवून दिला. अक्षरन १८ चेंडूत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३४ धावा केल्या, तर आशुतोष शर्माने ५ चेंडूत २ षटकार व एका चौकारासह १८ धावांची वादळी फटकेबाजी केली.

दिल्ली कॅपिटल्सने सामन्याची नाणेफेक जिंकत राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. यशस्वी जैस्वालने ३ चौकार मारत संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण एनगिडीने त्याला झेलबाद केलं. यानंतर वैभव सूर्यवंशी व ध्रुव जुरेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३४ चेंडूत ७० धावांची भागीदारी रचली. सूर्यवंशी २१ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावांची खेळी केली. तर ध्रुव जुरेल ४० चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ५३ धावा करत बाद झाला.

दुखापतीनंतर परतलेल्या रियान परागने २६ चेंडूत ३ चौकार व ५ षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. रियान पराग व ध्रुव जुरेल यांनी ४१ चेंडूत ७२ धावांची भागीदारी रचली. यासह इतर खेळाडूंच्या कामगिरीच्या बळावर राजस्थानने ८ बाद १९३ धावांची खेळी केली. वादळी सुरूवातीनंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी झटपट विकेट्स घेत राजस्थानच्या धावांना ब्रेक लावला. दिल्लीकडून मिचेल स्टार्कने एका षटकात ३ विकेट्स घेत एकूण ४ विकेट्स घेतल्या. तर लुंगी एनगिडी व माधव तिवारी यांनी २-२ विकेट्स घेतल्या.