Delhi Capitals into WPL 2026 Playoff: दिल्ली कॅपिटल्सने युपी वॉरियर्ज संघावर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. दिल्लीने सामना जिंकल्यामुळे मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर झाली आहे. युपी वॉरियर्ज संघाने या सामन्यात विजय मिळवला असता तर नेट रन रेटच्या बळावर मुंबई इंडियन्सला प्लेऑफ गाठण्याची अखेरची संधी होती. पण दिल्लीने युपीचा पराभव केला असून संघ आता एलिमिनेटर खेळणार आहे.
दिल्लीने सुरूवात चांगली केली, पण लागोपाठ विकेट्स गमावल्यानंतर दिल्ली पुन्हा एकदा अखेरच्या षटकांमध्ये पोहोचली. दिल्लीला विजयासाठी २४ चेंडूत २३ धावांची गरज होती. तेव्हा चिनेल हेन्री १७व्या षटकात दिप्ती शर्माकरवी झेलबाद झाली. तर जेमिमाने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत दबाव कमी केला. पुढच्या षटकातही जेमिमाने चौकार लगावला आणि शक्य तिथे डबल आणि सिंगल घेत संघाला विजयाच्या जवळ नेलं. त्यानंतर जेमिमाने १९व्या षटकात दोन चौकार लगावत सलग चौथ्यांदा प्लेऑफ गाठल्याचं निश्चित झालं.
दिल्लीने मुंबईला बाहेर करत प्लेऑफ गाठलं!
१२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लिझेल ली १० धावा करत लवकर बाद झाली. यांनीतर शफाली वर्मा व लॉरा वोल्व्हार्ड यांनी दिल्लीचा डाव सावरला. शफाली ३३ चेंडूत २ चौकारांसह २९ धावा करत बाद झाली. तर लॉरा ७ चौकारांसह ४७ धावांवर बाद झाल्याने तिचं अर्धशतक हुकलं. तर मारिजान काप शून्यावर व चिनेल हेन्री १ धाव करत बाद झाली, ज्यामुळे दिल्लीचा संघ पुन्हा संकटात सापडला. पण कर्णधार जेमिमा रॉड्रीग्जने मात्र या सामन्यात कोणतीही चूक न करता संघाला विजय मिळवून देत माघारी परतली.
दिल्लीने सामन्याची नाणेफेक जिंकत युपीला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीपुढे युपीचा संघ फक्त १२२ धावा करू शकला. चिनेल हेन्रीने पहिल्याच चेंडूवर मेग लॅनिंगला पायचीत करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला आणि इथूनच दिल्लीने विकेट्स घ्यायला सुरूवात केली. युपीकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक २४ धावा केल्या. तर सिमरन शेखने २२ धावांचं योगदान दिलं. तर खालच्या फळीत शिखा पांडेने १३ चेंडूत २३ धावा करत संघाला १०० धावांचा आकडा गाठून दिला.
दिल्लीकडून मारिजन कापने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर चिनेल हेन्री, श्रीचरणी यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर मिन्नू मणीने एक विकेट घेतली.

