Sanju Samson Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४८ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने दमदार विजयाची नोंद केली. मैदान दिल्लीचं होतं, पण सपोर्ट मात्र चेन्नई सुपर किंग्सला होता. कारण पूर्ण मैदान पिवळ्या रंगाने रंगलं होतं. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या दिल्लीवर चेन्नईचा संघ भारी पडला. दिल्लीने दिलेल्या १५६ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने नाबाद ८७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने चेन्नईला एकतर्फी विजय मिळवून दिला. यासह त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाच प्रतिनिधित्व केलेला संजू सॅमसन या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. चेन्नईकडून पदार्पण करताना त्याला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो सुपर फ्लॉप ठरला होता. पण एकदा गाडी रुळावर परतल्यनंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. आतापर्यंत त्याने २ शतकं झळकावली आहेत. दिल्लीविरूद्धच्या सामन्यात त्याच्याकडे तिसरं शतक झळकावण्याची संधी होती. पण हे शतक थोडक्यात हुकलं, कारण त्याआधीच आव्हान पूर्ण झालं होतं. पण अर्धशतक पूर्ण करताच तो आयपीएल स्पर्धेत १५० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने केएल राहुलच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

संजू सॅमसनने आयपीएल स्पर्धेत १५० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना आतापर्यंत २६ अर्धशतकं झळकावली आहेत. केएल राहुलच्या नावे देखील २६ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. या यादीत अव्वल स्थानी असलेल्या विराट कोहलीच्या नावे ३६ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या रोहित शर्माच्या नावे ३० अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. सूर्यकुमार यादवने २२ अर्धशतकं झळकावली आहेत. तर शुबमन गिलने २१, श्रेयस अय्यरने २० अर्धशतकं झळकावली आहे तर शिखर धवन, सुरेश रैना आणि एमएस धोनी यांच्या नावे प्रत्येकी १९ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे.

आयपीएलमध्ये १५० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा करताना सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

विराट कोहली- ३६ वेळेस
रोहित शर्मा- ३० वेळेस
संजू सॅमसन- २६ वेळेस
केएल राहुल – २६ वेळेस
सूर्यकुमार यादव- २२ वेळेस
शुबमन गिल- २१ वेळेस
श्रेयस अय्यर- २० वेळेस
शिखर धवन/ सुरेश रैना/एमएस धोनी- १९ वेळेस