David Miller -Axar Patel Viral Video: दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळाला. २११ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत लढा दिला. दुखापतग्रस्त असलेल्या डेव्हिड मिलरने शेवटच्या चेंडूपर्यंत एकाकी झुंज दिली. दिल्लीला हा सामना जिंकण्याची संधी होती. पण शेवटच्या २ चेंडूंवर दिल्लीच्या हातून निसटला. दिल्लीच्या विजयाचा हिरो बनण्याची संधी असलेला डेव्हिड मिलर थोडक्यात दिल्लीच्या पराभवाचं कारण ठरला. दरम्यान सामना झाल्यानंतर कर्णधार अक्षर पटेलने ज्या पद्धतीने त्याला धीर दिला, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डेव्हिड मिलरच्या हाताला दुखापत झाली होती. वेदना होत असतानाही त्याने फलंदाजी केली आणि सामना चेंडूपर्यंत नेला. जर त्याने पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली असती, तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता. पण क्रिकेट हा खेळ असाच आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येत नाही. १९.४ षटकापर्यंत सामना दिल्लीच्या हातात होता. पण शेवटच्या २ चेंडूंवर सामना फिरला गुजरातने विजय मिळवला.
कर्णधार असावा तर असा…
या सामन्यानंतर गुजरात टायटन्स संघातील खेळाडू देखील डेव्हिड मिलरला धीर देताना दिसून आले. कारण दिल्लीकडून खेळण्याआधी तो गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. तर कर्णधार अक्षर पटेलच्या कृतीने सर्वांचं मन जिंकलं. तो मैदानात आला, त्याने डेव्हिड मिलरला मिठी मारली आणि त्याचं सांत्वन केलं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, तो डेव्हिड मिलरला, “क्रिकेटमध्ये असं होत राहतं.. तू मॅचविनर खेळाडू आहेस. भविष्यात तू संघाला अनेक सामने जिंकून देशील..” असं म्हणताना दिसून येत आहे. त्याच्या या कृतीचं जोरदार कौतुक केलं जात आहे.
शेवटच्या चेंडूवर गुजरातचा विजय
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांअखेर २१० धावांचा डोंगर उभारला. गुजरातकडून कर्णधार शुबमन गिलने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तर वॉशिंग्टन सुंदरने ५५ धावा केल्या. जोस बटलरने ५२ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली. तर डेव्हिड मिलरने नाबाद ४१ धावा केल्या. पथूम निसांकाने ४१ धावा केल्या. दरम्यान गुजरातने हा सामना एका धावेने आपल्या नावावर केला.
