कोणाचं पारडं जड… दिल्ली की कोलकाता?; DC vs KKR सामन्याचा Preview, पाहा काय सांगतेय आकडेवारी

दोन्ही संघ आतापर्यंत एकमेकांविरोधात २९ सामने खेळलेत, जाणून घ्या काय सांगतेय आकडेवारी कोणाचं पारडं आहे जड अन् कोणत्या खेळाडूंवर आहे नजर

kkr vs dc
आज जिंकणारा संघ अंतिम सामन्यात चेन्नईविरुद्ध खेळणार

आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) ‘क्वालिफायर-२’चा सामना खेळला जाणार आहे. पहिल्यांदाच आयपीएलचं जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या मार्गात कोलकाता नाइट रायडर्सचा अडथळा आहे. याच दोन संघांमधून स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये कोण प्रवेश करेल हे आज निश्चित होणार आहे. आज या सामन्यातील विजेता संघ अंतिम सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मैदानात उतरणार आहे. मात्र या सामन्यामध्ये एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या या दोन्ही संघांचे आत्तापर्यंतचे रेकॉर्ड्स काय सांगतात, आज कोणत्या खेळाडूंच्या कामगिरीवर नजर असणार आहे, दोन्ही संघाच्या वाईट आणि जमेच्या बाजू कोणत्या याच संदर्भातील आढावा या येथे घेण्यात आलाय…

दोन्ही संघ तोलामोलाचे…
मागील वर्षी अंतिम फेरी गाठणाऱ्या दिल्लीला यंदा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यांना ‘क्वालिफायर-१’च्या सामन्यात चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीला अंतिम फेरीत प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. दुसरीकडे, दोन वेळच्या विजेत्या कोलकाताने ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघाला पराभूत केल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे शारजा येथे होणाऱ्या या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. हे दोन्ही संघ एकमेकांना चांगली टक्कर देतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळेच सामना एकतर्फी न होता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणार असेल असं मानलं जात आहे. दिल्लीने आतापर्यंत एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकलेली नाही तर कोलकात्याने दोनवेळा हा भीमपराक्रम केलाय.

दिल्लीला फलंदाजांकडून अपेक्षा
सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी यंदा दिल्लीला सातत्याने चांगली सुरुवात मिळवून दिली आहे. त्यामुळे या दोघांकडून दिल्लीला पुन्हा आक्रमक खेळीची अपेक्षा आहे. तसेच मधल्या फळीत श्रेयस अय्यर चांगली कामगिरी करत असून कर्णधार पंत आणि शिमरॉन हेटमायर हे विजयवीरची भूमिका चोख बजावत आहेत.

गोलंदाजीची मात्र दिल्लीला चिंता
आनरिख नॉर्किए, कागिसो रबाडा आणि आवेश खान या तेज त्रिकुटाने दिल्लीच्या यशात मोलाचे योगदान दिले आहे. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल टिच्चून मारा करत आहे. परंतु रविचंद्रन अश्विनच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. मागील पाच सामन्यांत त्याने केवळ तीन बळी घेतले आहेत.

कोलकात्याच्याच्या फलंदाजीची जबाबदारी तरुणांवर
यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गन आणि अनुभवी दिनेश कार्तिक यांना धावांसाठी झुंजावे लागले आहे. त्यामुळे शुभमन गिल आणि वेंकटेश अय्यर या सलामीवीरांसह राहुल त्रिपाठी (यंदा संघाकडून सर्वाधिक ३९३ धावा) या युवा त्रिकुटावर कोलकाताच्या फलंदाजीची भिस्त आहे.

फिरकीत केकेआर सर्वोत्तम
कोलकाताने ‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांच्या या यशात सुनील नरिन (१४ बळी) आणि वरुण चक्रवर्ती (१६ बळी) या फिरकी जोडगोळीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नरिनने बेंगळूरुविरुद्ध (४/२१ आणि २६ धावा) अष्टपैलू कामगिरी केली होती. या दोघांना लॉकी फग्र्युसन आणि शिवम मावी यांची साथ लाभेल.

या पर्वातील कामगिरी कशी?
आतापर्यंत या सिझनमध्ये म्हणजेच आयपीएल २०२१ मध्ये दोन्ही संघांनी एकमेकांविरोधात खेळताना प्रत्येकी एक सामना जिंकलाय. मात्र एकंदरित विचार करायचा झाल्यास आतापर्यंत हे दोन्ही संघ एकमेकांसमोर २९ वेळा आले असून यामध्ये केकेआरचं पारडं जड दिसत आहे.

एकूण सामन्यांमध्ये कामगिरी कशी?
केकेआरने सर्व आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध खेळलेल्या २९ पैकी १५ सामने जिंकलेत तर दिल्लीला १३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आलाय. एका सामन्याचा निकालच लागला नाही. मात्र दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतसाठी समाधानाची बाब ही आहे की मागील पाच वेळेपैकी तीन वेळा दिल्लीने केकेआरला पराभूत केलंय. यंदा शारजामध्ये झालेल्या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांविरोधात प्रत्येकी एक विजय मिळवलाय.

धावांचा पाठलाग करणं अधिक सोयीचं…
या दोन्ही संघांच्या सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना केकेआरने सात वेळा विजय मिळवलाय. तर दिल्लीला अशी कामगिरी पाच वेळा करता आलीय. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना दोन्ही संघांनी आतापर्यंतच्या २९ सामन्यांपैकी प्रत्येकी आठ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दुसऱ्यांदा बँटिंग करताना म्हणजेच धावांचा पाठलाग करताना दिल्लीने आठ वेळा कोलकात्याला पराभूत केलं आहे. तर कोलकात्यानेही आठ वेळा धावांचा पाठलाग करताना दिल्लीला धूळ चारलीय. नाणेफेक जिंकल्यास दोन्ही कर्णधार आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे. धावांचा पाठलाग करणं हे अधिक सोयीस्कर ठरेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

संघ कसे आहेत?

दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, ललित यादव, आवेश खान, रिपल पटेल, इशांत शर्मा, उमेश यादव, प्रवीण दुबे, विष्णू विनोद, कुलवंत खेजरोलिया, लुकमन मेरीवाला, शिमरॉन हेटमयार, स्टिव्ह स्मिथ, आनरिख नॉर्किए, कागिसो रबाडा, टॉम करन, बेन ड्वारशियस, मार्कस स्टोइनिस, सॅम बिलिंग्ज.

कोलकाता नाइट रायडर्स : ईऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शुभमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, गुरकीरत, करुण नायर, शेल्डन जॅक्सन, वरुण चक्रवर्ती, हरभजन सिंग, पवन नेगी, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, एम प्रसिध कृष्णा, संदीप वॉरियर, वैभव अरोरा, सुनील नरिन, शाकिब अल हसन, आंद्रे रसेल, लॉकी फग्र्युसन, टीम साऊथी, बेन कटिंग, टीम सायफर्ट.

सामना कधी आणि कुठे पाहता येणार?
वेळ : सायं. ७.३० वा.  ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्या)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dc vs kkr head to head records delhi capitals h2h record against kolkata knight riders ipl 2021 qualifier 2 scsg

फोटो गॅलरी