कोलकाता : ‘ओमायक्रोन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तनाचा धोका वाढत असल्यामुळे आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा निर्णय शनिवारी होणाऱ्या ९०व्या वार्षिक  सर्वसाधारण सभेत घेतला जाण्याची शक्यता आहे. सभेच्या २४ मुद्दय़ांच्या विषयपत्रिकेमध्ये भविष्यातील दौऱ्यांच्या कार्यक्रमपत्रिकेवरही चर्चा होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या नियोजित दौऱ्याला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून, या दौऱ्यातील दोन कसोटी सामने जोहान्सबर्गला आहेत. परंतु ‘ओमायक्रोन’च्या विषाणू संसर्गामुळे आफ्रिकेमधील स्थिती गंभीर आहे. भारतीय संघ ९ डिसेंबरला मुंबईहून जोहान्सबर्गला रवाना होणार होता. परंतु दौऱ्याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. भारतीय संघ आफ्रिकेत तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठीच्या महालिलावाची तारीखसुद्धा  या बैठकीत निश्चित होईल. या लिलावाआधी अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवे संघ तीन खेळाडूंची निवड करू शकतील.