बुधवारी झालेल्या सामन्यात फ्रान्सला इक्वेडोरविरुद्ध एकही गोल करता न आल्याचा फटका सट्टेबाजांना बसला. हा सामना फ्रान्स सहज खिशात टाकेल, अशी सट्टेबाजांची अटकळ पंटर्सनी फोल ठरविली. फ्रान्स विजयी होईल, यासाठी ६० पैसे देऊ करणाऱ्या सट्टेबाजांनी इक्वेडोरसाठी सव्वा दोन रुपये देऊ केले होते. तेथेच सट्टेबाजांचे गणित चुकले. सट्टेबाजारात चौथ्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सकडून अशा खेळाची अपेक्षा न ठेवणाऱ्या भारतीय सट्टेबाजांनी आता मात्र पुन्हा सावध खेळी सुरू केली आहे. बोस्निया विरुद्ध इराण या सामन्यात सट्टेबाजांना अनुकूल निकाल मिळाला. स्वित्र्झलडने होंडुरासचा धुव्वा उडवला. अर्जेटिनाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. त्यामुळे सट्टेबाज खूश आहेत. शुक्रवार हा विश्रांतीचा दिवस असला तरी सट्टेबाजारात जोरदार उलाढाल सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात कोणता संघ अग्रक्रमी असेल, कोण किती गोल करणार? उपांत्यपूर्व, उपांत्य तसेच अंतिम फेरीत कोण असेल? अंतिम सामना कोण जिंकेल? यावर आता जोरदार सट्टा लावला जात आहे. भारतीय सट्टाबाजारानेही आता कात टाकली आहे. पूर्वीचा चिठ्ठीचा सट्टा गायब झाला आहे. त्यांनीही ऑनलाइन सट्टय़ावर भर दिला आहे. आपल्याकडे एक संकेतस्थळ सुरू झाले तर ते काही तासांनी बंद केले जाते. तो तपशील अन्यत्र साठविला जातो. त्याचा थांगपत्ता पोलिसांनाही कळत नाही.
पहिल्या फेरीनंतर संघांना दिलेला भाव
ब्राझील : ३५ पैसे ( ७/२);
जर्मनी : ४५ पैसे (१७/४);
अर्जेटिना : ५० पैसे (१९/४)
नेदरलँड्स आणि फ्रान्स :
दोन्ही संघांना समान भाव – चार रुपये (८/१)
(नेदरलँड्स वा फ्रान्स अंतिम सामना जिंकू शकणार नाही, असा सट्टेबाजाराचा कल आहे.)
तुमच्यासाठी काय पण..!
जेव्हा नाणे खणखणीत वाजत असते आणि आपल्याशिवाय कोणाची तरी अडवणूक होऊ शकते, असे जेव्हा वाटते तेव्हा मागण्या वाढतात आणि त्यांची तात्काळ पूर्तताही होते. मग समोर एखादी व्यक्ती असो किंवा संपूर्ण देश. असेच काहीसे पाहायला मिळाले ते घाना संघाच्या बाबतीत. घानाचा फुटबॉल विश्वचषकातील अखेरचा सामना पोर्तुगालशी होणार असून या सामन्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. असे असतानाच त्यांनी सरकारकडे त्वरित रोख मानधन देण्याची मागणी केली, नाही तर सरावावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली. अशा वेळी सरकार नाही म्हणण्याचे धाडस करणार नाही, हे त्यांना माहितीच होते आणि घडलेही तसेच. घाना सरकारने ‘तुमच्यासाठी कायपण’ असे म्हणत, ३० कोटी डॉलर्सची रोख रक्कम एका खास विमानाने थेट ब्राझीलला पाठवली असून घानाच्या खेळाडूंना सामन्यापूर्वी हातात मानधन मिळणार आहे. इतकी मोठी रोख रक्कम काही तासांमध्ये जमा करताना घाना सरकारला मात्र घाम फुटला होता.
चाहत्यांचे प्रेम उत्कट असते. या प्रेमाच्या विविध छटा फिफा विश्वचषक स्पध्रेतही पाहायला मिळतात. फ्रान्स-इक्वेडोर सामन्यानंतर अशाच एका रंगीबेरंगी चाहत्याने सुरक्षारक्षकांचे कडे भेदून थेट मैदान गाठले. आपल्याला भावणाऱ्या फुटबॉलपटूंना भेटताक्षणी त्याला आभाळ ठेंगणे वाटले. परंतु क्षणार्धात सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतले. वास्तवाचे भान आलेला हा चाहता मग मात्र गयावया करायला लागला.