TNPL 2026 Deeban Lingesh Hat-Trick: टी-२० क्रिकेटमध्ये हल्ली फलंदाजांसह गोलंदाजांचा दबदबाही पाहायला मिळत आहे. अनेक टी-२० लीग सुरू असून त्यामध्ये खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. यादरम्यान सामन्याच्या पहिल्या तीन चेंडूवर विकेट घेत भरातीय गोलंदाजाने हॅटट्रिक केली. तमिळनाडू प्रीमियर लीग २०२६ मध्ये ही अनोखी हॅटट्रिक झाली. या हॅटट्रिकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरं तर, लायका कोवई किंग्स आणि त्रिची ग्रँड चोलास यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना खेळला गेला. चेपॉक येथे झालेल्या या सामन्यात वेगवान गोलंदाज दीबन लिंगेशने शानदार कामगिरी करत डावाच्या पहिल्याच तीन चेंडूंवर तीन बळी घेतले आणि धुव्वा उडवला. त्याच्या या भेदक गोलंदाजीने समोरच्या संघाच्या फलंदाजी विभागाचा धुव्वा उडवला.
लायका कोवई किंग्स आणि त्रिची ग्रँड चोलास यांच्यात स्पर्धेतील दुसरा क्वालिफायर सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना कोवई किंग्सने २० षटकांत ५ गडी गमावून १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, त्रिची ग्रँड चोलासची सुरुवात अत्यंत खराब झाली; कोवई किंग्सकडून गोलंदाजी करणाऱ्या दीबन लिंगेशने डावाच्या पहिल्या तीन चेंडूंवरच तीन बळी घेतले.
दीबनने पहिल्याच चेंडूवर राजकुमार के. याला बाद केलं. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज एस. श्याम सुंदरने स्लिपमध्ये उभे असलेल्या सचिन बेबीकडे झेल दिला. लिंगेशचा धडाका तिथेच थांबला नाही; त्याने तिसऱ्या चेंडूवर एका शानदार इनस्विंगर टाकत जगदीशन कौशिकला ‘क्लीन बोल्ड’ करून तंबूत परत पाठवलं. त्याने आपल्या चार षटकांत १४ धावांत ३ बळी मिळवलं.
दीबन लिंगेशने हॅट्ट्रिक घेत लायका कोवई किंग्स संघाला शानदार सुरुवात करून दिली, त्यानंतर ‘त्रिची ग्रँड चोलसला सामन्यात पुनरागमन करता आलं नाही. दीबन लिंगेशव्यतिरिक्त एम. सिद्धार्थने ४ बळी घेतले, रमेश दिवाकरने २ आणि अमरीश आर.एस.ने १ बळी टिपला. त्रिची ग्रँड चोलसचा संघ १५.४ षटकांत ९९ धावांत सर्वबाद झाला; कर्णधार सुरेश कुमार वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. लायका कोवई किंग्सने हा सामना ८४ धावांनी जिंकला आणि या विजयासह संघाने अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. दीबन लिंगेश दुसऱ्या क्वालिफायरमधील संघाच्या विजयाचा हिरो ठरला.
