IPL 2026 Deepak Chahar Fake Note Celebration Video: आयपीएल २०२६ मध्ये खेळाडूंचे चिठ्ठी सेलिब्रेशन सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. विकेट्स घेतल्यानंतर किंवा अर्धशतक-शतक केल्यानंतर खेळाडू चिठ्ठी काढून आनंद साजरा करण्याचा प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे, पण मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने एका अनोख्या सेलिब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. दीपक चहरने केकेआर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात या चिठ्ठी सेलिब्रेशनची खिल्ली उडवली, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात फिन एलनला बाद केल्यानंतर, मुंबई इंडियन्सच्या या वेगवान गोलंदाजाने अशा खास शैलीत आनंद सेलिब्रेशन केलं की खेळाडूंसह चाहतेही हसू लागले. दीपकने आपल्या खिशातून एक काल्पनिक चिठ्ठी काढल्याचा अभिनय केला. आता चहरच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२६ च्या ६५ व्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत केकेआरसमोर १४८ धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. संघाला वेगवान सुरुवात करून देण्याची जबाबदारी फिन ॲलनवर होती. ॲलनने सुरुवातीला दोन चौकार मारून काही शानदार फटके मारले आणि तो आक्रमक पवित्रा घेत फलंदाजी करत होता. पण दीपक चहरने पहिल्याच षटकात त्याला माघारी धाडलं. त्याने ऑफ-स्टंपच्या बाहेर बॅक-ऑफ-लेंथ चेंडू टाकला, ज्यावर ॲलनने पुन्हा कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू बॅटच्या आतल्या कडेला लागून थेट स्टंपवर आदळला. चांगली सुरुवात करूनही ॲलन मोठी खेळी करू शकला नाही.
फिन ॲलनची विकेट घेतल्यानंतर, दीपक चहरने खिशातून एक काल्पनिक कागदाची चिठ्ठी काढल्याचा अभिनय करून ‘चिट्टी सेलिब्रेशन’ची नक्कल केली. त्याची ही कृती पाहून सर्वच जण हसू लागले आणि खरं तर, आयपीएल २०२६ मध्ये ‘चिठ्ठी सेलिब्रेशन’ हा एक मोठा ट्रेंड बनला आहे. याची सुरुवात गेल्या हंगामात अभिषेक शर्माने केली होती.
यंदा अनेक खेळाडू अशाच प्रकारे सेलिब्रेशन करताना दिसले. रघु शर्मा आणि उर्विल पटेल यांनीही हा ट्रेंड पुढे नेला. मात्र, अलीकडेच काही माजी क्रिकेटपटूंनी आकाश सिंगच्या अशाच जल्लोषावर नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज डेल स्टेन म्हणाले की, हा ट्रेंड आता जुना झाला आहे आणि खेळाडूंनी हे थांबवलं पाहिजे.
कोलकाता नाईट रायडर्सने पॉवरप्लेमध्येच उत्कृष्ट गोलंदाजी करत मुंबई इंडियन्सला १४७ धावांवर रोखलं. कॅमेरॉन ग्रीन आणि सौरभ दुबे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. ग्रीनने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत रोहित शर्माचा एक अप्रतिम झेल घेतला. मधल्या षटकांमध्ये सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी धावगती नियंत्रणात ठेवली. मात्र, अखेरीस कॉर्बिन बॉशच्या नाबाद ३२ धावांच्या जोरावर मुंबईने एक सन्मानजनक धावसंख्या उभारली.
