भारतीय कुस्तीपटू दीपक पूनिया याने सकाळी उपांत्य फेरीमध्ये धडक मारली होती. आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर चुरशीच्या सामन्यामध्ये विजय मिळवत कुस्तीमध्ये भारताला पदक मिळवण्याच्या आशा पल्लवित केल्या होत्या. दीपकने अगदी शेवटच्या सेकंदामध्ये आपल्या चिनी प्रतिस्पर्धकाला धोबीपछाड देत सामना जिंकला होता. मात्र दीपक पूनिया बुधवारी उपांत्य फेरीचा सामना जिंकू शकला नाही. फ्रीस्टाईल कुस्तीच्या ८६ किलो गटात दीपक पूनियाला अमेरिकन कुस्तीपटू डेव्हिड टेलरने पराभूत केले. त्यामुळे उद्या, ५ ऑगस्टला कांस्यपदकासाठी खेळणार आहे.

पुरुषांच्या ८६ किलो गटात भारताचा दीपक पुनियाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्याने अमेरिकन कुस्तीपटूविरुद्धचा सामना अवघ्या काही मिनिटांत गमावला. अमेरिकेच्या डेव्हिड टेलरने भारताच्या दीपक पुनियाविरुद्ध तांत्रिक गुणांच्या आधारावर १०-० ने विजय मिळवला.

बुधवारी सकाळी ८६ किलो वजनी गटामध्ये दीपक पूनियाने अगदी रोमहर्षक सामन्यात शेन नावाच्या चिनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला होता. दीपकने सामन्यातील पहिली गुण जिंकल्यानंतरही चिनी प्रतिस्पर्धी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र दीपकने त्याचे सर्व डावपेच हाणून पाडले आणि शेवटच्या सेकंदामध्ये निर्णयाक आघाडी मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली होती. अगदी शेवटच्या काही सेकंदांमध्ये दीपकने टाकलेला डावपेच न समजल्याने शेन पराभूत झाला.

तर दुसरीकडे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी आपली आगेकूच कायम ठेवली असून आज भारताच्या खात्यामध्ये अजून एक पदक निश्चित झालं आहे. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये ५७ किलो वजनी गटामध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया यानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव त्याने केला आहे. त्यामुळे भारताचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं चौथं पदक निश्चित झालं आहे. सुरुवातीला ५-९ अशा पिछाडीवर पडलेल्या रवीकुमारनं तीन महत्त्वाचे गुण कमावले. त्यामुळे रवीकुमारचा अंतिम फेरीत झोकात प्रवेश झाला आहे