विश्व अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत भारताची अव्वल खेळाडू दीपिका कुमारी हिला पुन्हा एकदा सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. कोरियाची ऑलिम्पिक विजेती खेळाडू ओक-ही यून हिच्याकडून अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्याने दीपिकाला सलग तिसऱ्यांदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
१९ वर्षीय दीपिकाने अंतिम फेरीत झकास सुरुवात केली. तिने पहिल्या सेटमधील तिन्ही प्रयत्नांत १० गुण वसूल केले. मात्र तिसऱ्या सेटमध्ये दीपिकाला १० आणि ९ असे फक्त १९ गुण मिळवता आल्याने ती ४-६ अशी पिछाडीवर पडली. तिसऱ्या प्रयत्नांत तिला एकही गुण मिळवता आला नाही. आत्मविश्वास गमावल्यामुळे दीपिकाचे बाण योग्य दिशेने जात नव्हते. अखेर चौथ्या सेटमध्येही तिला २८ गुणांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे यून हिने ५-३ अशी आघाडी घेतली. दीपिकाला पहिल्यावहिल्या जागतिक सुवर्णपदकापासून रोखण्यासाठी तिला बरोबरीत रोखणे आवश्यक होते. कोरियाच्या यूनने दीपिकाला सामन्यात पुनरागमनाची कोणतीही संधी न देता २९ गुण मिळवले. यून हिने पाच सेटमध्ये २६, २८, २९, २८, २९ असे गुण मिळवले. दीपिकाने ३०, २८, १९, २७, २९ असे गुण पटकावले.
२००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या यून हिचे हे २०१० नंतरचे दुसरे जागतिक सुवर्णपदक ठरले. दीपिकाचा हा यूनविरुद्धचा दुसरा पराभव ठरला. मे महिन्यात झालेल्या शांघाय जागतिक स्पर्धेत पंचांच्या चुकीच्या निर्णयांमुळे दीपिकाला यूनविरुद्ध धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. सलग चौथ्यांदा विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या दीपिकाचे हे सलग तिसरे रौप्यपदक ठरले. यापूर्वी दीपिकाने २०११ आणि २०१२मध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती.