भारताच्या दीपिका कुमारी हिने पोलंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी पात्रता फेरीत ४५४ गुणांसह आघाडीचे स्थान मिळवले आहे. तिने रिकव्‍‌र्ह प्रकारात ही कामगिरी केली.  
दीपिकाने लक्षणीय कामगिरी करीत असतानाच तिच्या सहकारी लक्ष्मी राणी माझी व लैश्राम बोम्बयलादेवी यांनी निराशा केली. त्यामुळे सांघिक विभागात भारताला पहिले स्थान घेता आले नाही. भारतीय संघ १३१९ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीन संघाने १३३० गुणांसह आघाडी घेतली आहे.
पुरुष विभागात भारताच्या तरुणदीप राय याने सातत्यपूर्ण कामगिरी करीत पाचवे स्थान घेतले आहे. जयंत तालुकदार व अतनु दास हे अनुक्रमे सातव्या व आठव्या क्रमांकावर आहेत. भारताने १३३९ गुणांसह आघाडी स्थानावर झेप घेतली आहे. अमेरिका (१३३५) व इटली (१३२९) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राय व दीपिका यांनी मिश्र दुहेरीच्या पात्रता फेरीत अग्रस्थान निश्चित केले आहे.