जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या दीपिका कुमारीच्या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत (तिसरी फेरी) सुवर्णवेध घेतला. दीपिकाच्या सुवर्ण आणि कांस्यपदकामुळे भारताने या स्पर्धेत चौथ्या स्थानावर मजल मारली.
सोसाटय़ाचे वारे वाहत असतानाही दीपिकाने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करत चार वेळा दहापैकी दहा गुणांची कमाई केली. त्यामुळे भारतीय संघाने चीनचा २०१-१८६ असा धुव्वा उडवत सांघिक सुवर्णपदकावर नाव कोरले. शांघाय २०११च्या स्पर्धेनंतर भारताने पहिल्यांदाच जागतिक सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. दीपिका आणि अतानू दास या मिश्र दुहेरी जोडीने मेक्सिकोचा १५०-१३२ असा १८ गुणांनी पराभव करत सांघिक कांस्यपदक पटकावले.
भारताने एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदकांसह चौथे स्थान प्राप्त केले. अमेरिकेने दोन सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह अव्वल स्थानी झेप घेतली. चीन (२ सुवर्ण, १ रौप्य, २ कांस्य) आणि कोलंबिया १ सुवर्ण, १ रौप्य) या देशांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.
झु जिंग, चेंग िमग आणि कुई युआनयुआन या लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या चीन संघाने पहिल्या फेरीत सुमार कामगिरी केली. त्यामुळे भारताने ४६-३३ अशी मजबूत आघाडी घेतली. चीनने १४७-१३४ अशी पिछाडी भरून काढली. वाऱ्याच्या प्रभावामुळे दहापैकी दहा गुण मिळवणे अशक्य होते. अशा परिस्थितीतही दीपिकाने आपल्या गुणवत्तेची छाप पाडत भारताला १५ गुणांच्या फरकाने सुवर्णपदक मिळवून दिले. आता जागतिक स्पर्धेची अखेरची फेरी वॉरसॉ (पोलंड) येथे १९ ते २५ ऑगस्टदरम्यान रंगणार आहे.