Deepti Sharma T20I Record INDW vs SLW: भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. तिसऱ्या सामन्यात दीप्ती शर्माने दुसरी विकेट घेत असा विक्रम आपल्या नावे केला आहे, जो भारताच्या पुरूष आणि महिला संघांमध्ये कोणताही खेळाडू करू शकलेला नाही.
दीप्ती शर्माची तब्येत ठिक नसल्याने ती दुसऱ्या सामन्यात खेळली नव्हती. पण तिसऱ्या सामन्यात तिला संधी मिळताच चमारी अट्टापटूला बाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत श्रीलंकेला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण भारताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केल्याने श्रीलंकेचा संघ कसाबसा १०० धावांच्या पलीकडे पोहोचला.
दीप्ती शर्माने या सामन्यात २ विकेट्स घेत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५० विकेट्स घेणारी भारताची पहिली गोलंदाज ठरली. भारताच्या महिला संघांमध्ये नाही तर पुरूष संघामध्ये कोणताच गोलंदाज टी-२० क्रिकेटमध्ये १५० विकेट्स घेऊ शकलेला नाही. दीप्ती शर्माने चमारी अट्टापटूला बाद केल्यानंतर मोठे फटके खेळणाऱ्या कविशा दिलहारीला झेलबाद करत १५० विकेट्सचा टप्पा गाठला.
दीप्ती शर्माने पुढे सामन्यात मालशा शेहानीला क्लीन बोल्ड करत तिसरी विकेट मिळवली. यासह दीप्तीने टी-२० क्रिकेटमध्ये १५१ विकेट्सचा पल्ला गाठला. दीप्तीने यासह टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मेगन शूटची बरोबरी केली आहे. यासह मेगन शूट व दीप्ती शर्मा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५१ विकेट्स घेण्याच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत.
दीप्ती शर्माने १३१ सामन्यांमधील १२८ डावांमध्ये सर्वाधिक १५१ विकेट्स घेतल्या आहेत. दीप्तीने ४६३.५ षटकांमध्ये २७८३ चेंडू टाकत १३ मेडन षटकं टाकली आहेत. १० धावांमध्ये ४ विकेट्स ही तिची सर्वाेत्कृष्ट कामगिरी आहे.
महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या महिला गोलंदाज
दीप्ती शर्मा (भारत महिला) – १५१ विकेट्स
मेगन शूट (ऑस्ट्रेलिया महिला) – १५१ विकेट्स
हेन्रिएट इशिमवे (दक्षिण आफ्रिका महिला) – १४४ विकेट्स
निदा दार (पाकिस्तान महिला) – १४४ विकेट्स
सोफी एकलस्टन (इंग्लंड महिला) – १४२ विकेट्स
