Deepti Sharma Record In International Cricket: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाची दमदार कामगिरी सुरु आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला होता. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सला पराभवाची धूळ चारली आहे. या सामन्यात फलंदाजीत स्मृती मानधनाच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. तर गोलंदाजीत दीप्ती शर्माने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नेदरलँड्स संघाविरूद्धच्या सामन्यात तिने मोठ्या रेकॉर्डमध्ये दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दीप्ती शर्माने पाकिस्तानच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं होतं. या सामन्यात तिने ४ षटकात अवघ्या १० धावा खर्च करुन ५ गडी बाद केले होते. या कामगिरीच्या बळावर तिने प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. नेदरलँड्सविरूद्ध झालेल्या सामन्यात तिने ३ षटकात २६ धावा खर्च करुन १ गडी बाद केला. यासह तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५५ गडी बाद करण्याचा पल्ला गाठला आहे. यासह तिने भारताची माजी गोलंदाज झुलन गोस्वामीच्या सर्वाधिक गडी बाद करण्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. दोघांच्या नावे आता ३५५-३५५ गडी बाद करण्याची नोंद आहे. या रेकॉर्डच्या यादीत कॅथरीन सिव्हर ब्रंट, एलिस पेरी आणि सोफी एक्लेस्टेन या गोलंदाजांचा समावेश आहे.

महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

झुलन गोस्वामी- ३५५ गडी
दीप्ती शर्मा- ३५५ गडी
कॅथरीन सिव्हर ब्रंट- ३३५ गडी
एलिस पेरी-३३२ गडी
सोफी एक्लेस्टोन-३२७ गडी
शबनम इस्माइल- ३१८ गडी

दीप्ती शर्मा ही अष्टपैलू खेळाडू आहे. तिने गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान दिलं आहे. तिने आपल्या वनडे कारकिर्दीतील १२४ सामन्यांमध्ये १६६ गडी बाद केले आहेत. दीप्ती ही भारताची वनडे क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिने १४६ सामन्यांमध्ये १६७ गडी बाद केले आहेत. यासह कसोटी क्रिकेटमध्ये तिने २२ गडी बाद केले आहेत.

भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यात शेफाली वर्माने ५५ धावांची खेळी केली. तर स्मृती मानधनाने ७४ धावांची खेळी करुन संघाची धावसंख्या २० षटकात ५ गडी २०९ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. अफगाणिस्तानचा डाव अवघ्या ११४ धावांवर आटोपला.