scorecardresearch

चुकीला माफी नाही; शार्ली डीनने ७२ वेळा क्रीझ सोडलं होतं, ७३व्या वेळी दिप्तीने केलं बाद!

दीप्ती शर्मानं शार्ली डीनला मंकडिंग करत धावबाद केल्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे. पण नेमकं त्या सामन्यात घडलं काय होतं?

चुकीला माफी नाही; शार्ली डीनने ७२ वेळा क्रीझ सोडलं होतं, ७३व्या वेळी दिप्तीने केलं बाद!
'त्या' सामन्यात शार्ली डीननं तब्बल ७३ वेळा क्रीज सोडलं होतं!

भारतीय क्रिकेटपटू दीप्ती शर्माने इंग्लंडच्या शार्ली डीनला धावबाद करून इतके दिवस उलटले पण हा विषय अजूनही क्रीडारसिकांमध्ये चर्चेत आहे. गोलंदाजी करताना चेंडू फेकायच्या आधीच क्रीझ सोडून पुढे गेलेल्या डीनला शर्माने धावबाद केले आणि सामन्यासह मालिकाही भारताने खिशात टाकली.

हा सभ्यपणा नाही, क्रिकेटच्या स्पिरीटचे काय होणार? इथपासून ते मांकडिंगच्या उगमापर्यंत चर्चा सर्व माध्यमांवर झडल्या. विशेष म्हणजे हा प्रकार साक्षात क्रिकेटच्या पंढरीत ‘लॉर्ड्स’वर घडला. नियमाप्रमाणे फलंदाज गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटायच्या आत क्रीझ सोडत असेल तर त्याला धावबाद करता येते व त्याआधी तशी सूचनाही द्यायची गरज नसते. इयान चॅपेल यांनी तर स्पष्टच सांगून ठेवलंय की यष्टिचीत करायच्या आधी यष्टिरक्षक फलंदाजाला सूचना देतो का मग इथे काय गरज आहे? साधे नियम जर फलंदाज पाळत नसतील तर त्यांना धावबाद करण्यात गैर काय असा सवाल चॅपेल यांनी विचारलाय.

पण या सगळ्यात आता आणखी एक नवीनच पैलू पुढे आला आहे. पीटर डेला या प्रख्यात क्रीडा पत्रकाराने या प्रकरणाच्या मूळाशी जाऊन काही निरीक्षणे नोंदवली आहेत. डेलांनी केलेली निरीक्षणे त्यांनी ट्विटरवर थ्रेडमध्ये दिली आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला असताना शार्ली डीनने त्या सामन्यात तब्बल ७२ वेळा आधीच क्रीझ सोडले होते असे डेला यांनी म्हटले आहे. अखेर ७३व्या वेळी जेव्हा डीनने चेंडू टाकायच्या आधीच क्रीझ सोडले त्यावेळी दिप्ती शर्माने तिला धावबाद केले.

डेला यांनी हे निरीक्षणही नोंदवलंय की डीन व्यतिरिक्त इंग्लंडच्या दुसऱ्या एकाही खेळाडूने चेंडू गोलंदाजाच्या हातातून सुटायच्या आधी क्रीझ सोडलेले नव्हते. बाकी सर्व फलंदाजांनी योग्य ती सावधिगिरी बाळगली होती पण डीनने मात्र या नियमाची तमाच बाळगली नव्हती.

विश्लेषण: ‘मांकडिंग’ची चर्चा नव्याने का सुरू झाली? इंग्लिश क्रिकेटप्रेमींना त्याचे वावडे का?

दीप्ती शर्माने नंतर स्पष्ट केले की धावबाद नियोजन करूनच केले गेले, परंतु त्यापुर्वी पुरेशा सूचना डीनला देण्यात आल्या होत्या. तिला अनेकवेळा क्रीझ आधी सोडू नको असे सांगितले होते असे शर्माने सांगितले. तर, डीनला कुठलीही सूचना करण्यात आली नव्हती व दिप्ती खोटे बोलत आहे असा दावा इंग्लंडची कर्णधार हिदर नाईटने केला. ट्विटरवर व्यक्त होताना नाइटने म्हटले, “खेळ संपलाय, शार्लीला नियमांच्या अधीन राहून बाद करण्यात आले आणि भारत सामना तसेच मालिका जिंकण्यास योग्यच होता. पण डीनला सूचना देण्यात आली नव्हती, तशी गरजही नाहीये. सूचना न देण्यामुळे धावबाद अग्राह्य होत नाही.”

या पद्धतीने धावबाद करणे भारताला योग्य वाटत असेल तर त्यांनी सूचना दिली होती वगैरे खोटे बोलून आपल्या निर्णयाचे समर्थन करू नये असेही तिने पुढे म्हटले आहे. डेला यांच्या दाव्यामुळे हे मात्र दिसतंय की दिप्तीने सूचना दिली होती की नव्हती हा वेगळा मुद्दा आहे, परंतु जर एकाच सामन्यात तब्बल ७२ वेळा डीनने गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटायच्या आत पॉपिंग क्रीझ सोडले असेल तर जे झाले ते योग्यच झाले असे म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या